उपराजधानीला कुपोषणाचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नागपूर - दुर्गम भागामध्ये हमखास आढळणाऱ्या कुपोषणाने ‘स्मार्ट’ होऊ घातलेल्या उपराजधानीलादेखील विळखा घातला आहे. शहरात वर्षागणिक कुपोषितांची संख्या वाढत असून, आजघडीला मध्यम प्रकारात मोडणाऱ्या कुपोषितांची संख्या २२ हजार ९९७, तर तीव्र कुपोषितांचा आकडा २ हजार ६७० इतका आहे.

नागपूर - दुर्गम भागामध्ये हमखास आढळणाऱ्या कुपोषणाने ‘स्मार्ट’ होऊ घातलेल्या उपराजधानीलादेखील विळखा घातला आहे. शहरात वर्षागणिक कुपोषितांची संख्या वाढत असून, आजघडीला मध्यम प्रकारात मोडणाऱ्या कुपोषितांची संख्या २२ हजार ९९७, तर तीव्र कुपोषितांचा आकडा २ हजार ६७० इतका आहे.

नागपूरप्रमाणेच अमरावती जिल्हादेखील कुपोषणाने पीडित आहे. कुपोषणबाबत नुकत्याच  झालेल्या सर्वेनुसार नागपुरातील कुपोषितांचा आकडा वाढला आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक संख्येने कुपोषित बालक शहरात असल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यानुसार ही संख्या सुमारे ५ हजारांच्या घरात आहे. वर्षभरात १७ हजार व्यक्तींचा मृत्यू कुपोषणामुळे झाला. त्यात बालक आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

शहरातील विविध वस्त्यांमध्ये कुपोषित बालकांचे प्रमाण दिसून येत आहे. यावर प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे म्हणणे आहे. प्रशासनाने तत्काळ आरोग्य केंद्रावर महिला आणि बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती करावी, केंद्रावर  सकस आहार आणि आवश्‍यक त्या औषधांचा मुबलक पुरवठा करावा. तसेच अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर माता आणि कुपोषित बालकांना त्यांचे नियमित वाटप करण्याची मागणी विदर्भ प्रदेश विकास परिषदेने केली आहे.

यंत्रणा कामाला लागणार
शहरातील वाढलेल्या कुपोषणाबाबत महेमूद अन्सारी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना निवेदन दिले आहे. यामध्ये कुपोषणाची समस्या मुळासकट सोडविण्यासाठी प्रशासनाने तत्काळ प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. याची गंभीर दखल घेत कुर्वे यांनी यंत्रणा लगेच कामाला लावण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

Web Title: nagpur news vidarbha malnutrition