सांडपाण्याच्या वादातून दुकानदाराचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

नागपूर - हातपंपावरील सांडपाणी घराजवळून जात असल्याने हातंपप बंद का करता, अशी विचारणा केल्याने सहा जणांनी दुकानदाराला जबर मारहाण केली. या मारहाणीत दुकानदाराचा जागीच मृत्यू झाला. दोन महिलांसह सहा जणांवर गुन्हे दाखल केले असून, चौघांना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. नितीन हरिनारायण सोनी (वय ४२, रा. बजेरिया, गणेशपेठ) असे खून झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. 

नागपूर - हातपंपावरील सांडपाणी घराजवळून जात असल्याने हातंपप बंद का करता, अशी विचारणा केल्याने सहा जणांनी दुकानदाराला जबर मारहाण केली. या मारहाणीत दुकानदाराचा जागीच मृत्यू झाला. दोन महिलांसह सहा जणांवर गुन्हे दाखल केले असून, चौघांना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. नितीन हरिनारायण सोनी (वय ४२, रा. बजेरिया, गणेशपेठ) असे खून झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. 

नितीन सोनी हे पत्नी रिता, मुलगा मोहित (१२) आणि मुलगी गौतमी (वय ६) यांच्यासह बजेरियात राहत होते. त्यांचे जनरल स्टोअर्स आहे.  त्यांच्या घराशेजारी आरोपी मुकेश मौर्य, राजेंद्र मौर्य आणि अशोक मौर्य हे तिघे भावंडे किरायाने राहतात. मौर्य भावंडे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. नितीन सोनी आज बुधवारी सकाळी दुकानात गेले होते. साडेदहा वाजता वस्तीत असलेल्या हातपंपाच्या पाण्यामुळे घाण होत असल्याचे कारण सांगून मौर्य भावंडांनी हातपंप बंद पाडण्याचा प्रयत्न केला. कॉलनीतील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागू नये म्हणून शेजारी राहणारे बंडू हिरनखेडे यांनी विरोध केला.  त्यामुळे राजेंद्र, मुकेश आणि अशोक हे बंडू यांच्याशी वाद घालून मारहाण करीत होते. दरम्यान, नितीन यांचे मोठे बंधू नवनीत सोनी यांनी मध्यस्थी केली आणि भांडण सोडवले. हातपंप बंद पाडण्यास विरोध केला आणि दुकानात निघून गेले. नितीन सोनी हे दुकानातून घरी परतत असतानाच मौर्य भावंडांनी त्यांना शिवीगाळ केली. मात्र, नितीन यांनी दुर्लक्ष करीत घरी गेले. मौर्य भावंडांनी नितीन यांना घराबाहेर बोलवून मारहाण केली. दरम्यान, मुकेशची पत्नी सपना आणि राजेंद्रची पत्नी माया व मुकेशचा मुलगा अमन यांनी घरातून रॉड, पाइप आणि झारा आणला. त्या सर्वांनी नितीन यांच्यावर हल्ला चढवून छातीत जोरजोरात ठोसे लगावले. गंभीर जखमी झालेले नितीन जागेवरच बेशुद्ध झाले. नागरिकांनी नितीन यांना मेयोत दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी मुकेश मौर्य, त्याची पत्नी सपना, मुलगा अमन आणि माया राजेंद्र मौर्य यांना अटक केली. राजेंद्र आणि अशोकचा पोलिस शोध घेत आहेत. 

कॉलनीत आहे दहशत
आरोपी मुकेश मौर्य व त्याच्या कुटुंबीयांची कॉलनीत दहशत आहे. ते कॉलनीतील सर्वांनाच त्रास देतात. राजेंद्र इलेक्‍ट्रिशियन आहे तर मुकेश हा ठेकदार आहे. मौर्य कुटुंबाविरुद्ध बोलण्याची कुणाचीही हिंमत नाही. त्यांच्या दहशतीमुळे अनेक जण कॉलनी सोडून गेले. कुणालाही मारहाण करणे किंवा अश्‍लील शिवीगाळ करण्यासाठी मौर्य कुटुंब अग्रेसर आहे.

मौर्य भावंडांविरुद्ध अनेक तक्रारी
मुकेश, राजेंद्र आणि अशोक यांच्याविरुद्ध यापूर्वी गणेशपेठ पोलिस ठाण्यात अनेक तक्रार अर्ज आहेत. गेल्या वर्षभरापूर्वीही संपूर्ण कॉलनी मौर्य भावंडाच्या विरोधात गणेशेपठ पोलिस ठाण्यात तक्रारीसह आली होती. दरम्यान, डीसीपी अभिनाश कुमार यांनी कैफियत ऐकूण घेत मौर्य भावंडांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी गांभीर्य न दाखल्यामुळे त्यांची हिंमत वाढली होती. 

Web Title: nagpur news vidarbha murder