सिटिझन पोर्टल ॲप झाले अनइन्स्टॉल

मंगळवार, 30 जानेवारी 2018

सीसीटीएनएस प्रणालीमध्ये पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची नोंद घेताच ती माहिती ॲपवर दिसते. ही प्रक्रिया नियमित करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे. जर सीसीटीएनएसवर काम करणारे पोलिस कर्मचारी योग्यरीत्या माहिती दाखल करीत नसतील तर ही बाब गंभीर आहे. त्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल.
- संजीव कुमार, अतिरिक्‍त पोलिस महासंचालक, सीआयडी.

नागपूर - पोलिस विभागाला पेपरलेस आणि डिजिटल करण्यासाठी मोठा गाजावाजा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सिटिझन पोर्टल ॲप’चे उद्‌घाटन केले. ऑनलाइन तक्रार आणि एफआयआरची प्रत थेट मोबाईलवरून देण्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र, अवघ्या तीन महिन्यांतच हे ॲप फक्त शोभेचे झाले आहे. माहितीच अपडेट झाली नसल्याने अनेकांनी ते अनइन्स्टॉल केले आहेत. 

घरबसल्याच मोबाईलवरून थेट ऑनलाइन तक्रार करा तसेच पोलिस विभागातील माहिती थेट मोबाईलवर मिळवा, असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी केले होते. त्यासाठी ‘सिटिझन पोर्टल ॲप’ उपलब्ध करून देण्यात आले होते. त्या ॲप वापरण्यासाठी राज्यातील पोलिसांना सक्‍तीही करण्यात आली होती. या ॲपमध्ये ऑनलाइन तक्रार, हरविलेल्या व्यक्‍तीचा शोध, तक्रारींची सद्यस्थिती, अनोळखी मृतदेह, बेपत्ता झालेल्या व्यक्‍तींची माहिती, सेवा-विनंती, अटकेतील आरोपी, हरविलेल्या वाहनांची चौकशी आणि राज्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यात दाखल झालेले एफआयआर हे एका क्‍लिकवर मिळतील, असा दावा करण्यात आला होता. महिला व महाविद्यालयीन युवतींना या ॲपद्वारे तत्काळ मदत मिळण्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील जवळपास तीन लाखांपेक्षा जास्त मोबाईलधारकांनी ॲप डाउनलोड केले. 

ॲपचे लोकार्पण झाल्याच्या तीन महिन्यांपर्यंत माहिती नियमितपणे ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, त्यानंतर या ॲपचे गांभीर्य संपले. कोणत्याही पोलिस स्टेशनमधील पूर्णपणे माहिती ॲपमध्ये अपलोड होत नसल्याने अनेकांनी कंटाळून ॲप अनइन्स्टॉल केले तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया नोंदवित पोलिस विभागाच्या इभ्रतीचे वाभाडे काढले.

सीसीटीएनएस अपडेशन नाही
राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात सीसीटीएनएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक तक्रार आता ऑनलाइन राज्यभरातील वरिष्ठांना बघता येते. मात्र, सीसीटीएनएसवर काम करणारे अनेक पोलिस कर्मचारी प्रशिक्षित नसल्यामुळे कामाचा खोळंबा होत आहे. याच कारणामुळे तत्काळ एफआयआर नोंदविण्यास तासन्‌तास उशीर लागत आहे. तसेच अपडेट होत नसल्यामुळे सिटीझन पोर्टल ॲपवरही दिसत नाही. डिजिटल पोलिसिंग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पोलिस कर्मचारी सकारात्मक घेत नसल्यामुळेच ॲप बारगळल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: nagpur news vidarbha news citizen portal uninstall