काँग्रेस उघडे पाडणार सरकारचे पितळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

नागपूर - केंद्र तसेच राज्य शासनाची प्रत्येक घोषणा फसवी असल्याचा आरोप करीत भाजप सरकारचे पितळ उघडे पाडण्यासाठी ग्रामीण काँग्रेसने कंबर कसली आहे. गावातील प्रत्येक चावडीवर सरकारच्या घोषणांच्या वाचनासह ‘पोस्टमार्टेम’ करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.  

नागपूर जिल्हा काँग्रेसची बैठक अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेत गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात पार पडली. आमदार सुनील केदार, माजी आमदार आनंदराव देशमुख, एस. क्‍यू. झामा, देवराव रडके, बाबूराव तिडके, मोहम्मद शहाजहाँ शफाअत अहमद, हुकुमचंद आमधरे, चंद्रपाल चौकसे, मनोहर कुंभारे, शिव यादव, कुंदा राऊत, वसंतराव गाडगे  उपस्थित होते. राज्य शासनाने शेतकऱ्यांना केलेली कर्जमाफी व केंद्र सरकारने लागू केलेला जीएसटीवर यावेळी ऊहापोह झाला. राज्य सरकारने कर्जमाफी घोषित करून पंधरवडा लोटत नाही, तोच दोनदा धोरणात बदल केल्याने मुळक यांनी सरकारला धारेवर धरले. १० हजारांची मदत शेतकऱ्यांना मिळालीच नाही, आता दुबार पेरणीचे संकटही त्यांच्यावर आहेत.

शासनाची प्रत्येक घोषणाच फसवी असल्याची टीका त्यांनी केली. जीएसटीमुळे व्यापारी संतप्त आहे, तर नोकरी नसल्याने तरुणाईत निराशा आहे. देशात मात्र सारेकाही आलबेल असल्याचे खोटे चित्र रंगविले जात असल्याचा आरोप करीत भाजपचे पितळे उघडे पाडण्याचा निर्धार मुळक यांनी व्यक्त केला. आमदार सुनील केदार यांनीही कर्जमाफी शेतकऱ्यांचा अधिकार असल्याचे ठासून सांगितले. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, ते आता देशभक्तीचे धडे देत असल्याचे नमूद करीत त्यांनी भाजपला टोला हाणला.

Web Title: nagpur news vidarbha news congress