नागपूरच्या महापौरांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नागपूर - निवडून आल्यानंतर राजीनामा घेण्याची भाजपची परंपरा अनेक नव्या नगरसेवकांना रुचली नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता पक्षाच्या बैठकांना हजेरी लावत  नसल्याने ४२ नगरसेवकांना बेशिस्त घोषित करून भाजपने नोटीस बजावली. यात महापौर नंदा जिचकार यांचाही समावेश असल्याचे समजते. त्यामुळे भाजपच्या अनेक नगरसेवकांत संताप असून ‘कुठली अवदसा सुचली अन्‌ भाजपची उमेदवारी घेतली’, अशी कुजबूज आपसात चर्चेदरम्यान ते करीत आहेत. 

महापालिका निवडणुकीत भाजपने १५१ पैकी १०८ जागा जिंकून सत्तेची हॅट्ट्रिक साधली. यात मोठ्या प्रमाणात नवीन नगरसेवक निवडून आले. अनेकांना भाजपच्या परंपरेशी देणे-घेणे  नसलेलेही या गर्दीत निवडून आले.

अशांना आता भाजपच्या परंपरेचा जाच होऊ लागल्याचे चित्र आहे. एकीकडे प्रभागातील विकासकामांच्या फाइल मंजूर होत नाही, त्यात राजीनामा घेणे, बैठकांना उपस्थित राहण्याची सक्ती या सर्व बाबींचे नव्या नगरसेवकांना अजीर्ण होऊ लागले  आहे. नगरसेवकांकडून राजीनामा घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता सातत्याने पक्षाने आयोजित केलेल्या बैठकीकडे पाठ फिरविणाऱ्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. यात ४२ नगरसेवकांचा समावेश असून महापौर नंदा जिचकार यांनाही बेशिस्तीचा ठपका ठेवत नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. महापौरांना नोटीस देऊन पक्षाने बैठकीस सातत्याने अनुपस्थितीत राहणाऱ्या नगरसेवकांनाही कठोरतेचे संकेत दिले आहे.

नगरसेवकांनी दिले राजीनामे!
भाजप नगरसेवकानी राजीनामे देण्याचे सत्र सुरू झाले असून सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी ३ तारखेपर्यंत सर्व नगरसेवक राजीनामे देतील, असे नमूद केले. सत्तापक्ष नेते संदीप जोशी शहरात नसल्याने आज काही नगरसेवकांनी पक्षाच्या प्रतोद दिव्या धुरडे यांच्याकडे राजीनामे सोपविले.

महापौरांची बैठकीकडे पाठ
नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीकडे महापौरांनीही पाठ फिरविली होती, असे एका नगरसेवकाने सांगितले. पक्षाने बोलावलेल्या बैठकीला सतत गैरहजर राहणे हा पक्षशिस्तीचा भंग असून याची गंभीर दखल घेत नगरसेवकांना कारणे दाखवा बजावण्यात आली असल्याचे पक्षातील एका ज्येष्ठ नगरसेवकाने नमूद केले.

Web Title: nagpur news vidarbha news mayor nanda jichkar notice