अखेर शांताबाईला मिळाला निवारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नागपूर - मातृदिनी ‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या शांताबाईची व्यथा वाचल्यानंतर स्माइल प्लस सोशल फाउंडेशन दहा दिवसांपासून तिला निवारा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यांच्या परिश्रमाने गुरुवारी शांताबाईला समाजकल्याणच्या माध्यमातून हक्काचा निवारा मिळाला. त्यामुळे शांताबाईच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

नागपूर - मातृदिनी ‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या शांताबाईची व्यथा वाचल्यानंतर स्माइल प्लस सोशल फाउंडेशन दहा दिवसांपासून तिला निवारा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यांच्या परिश्रमाने गुरुवारी शांताबाईला समाजकल्याणच्या माध्यमातून हक्काचा निवारा मिळाला. त्यामुळे शांताबाईच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

शांताबाईला सुशिक्षित तसेच शासकीय सेवेत असलेल्या मुलाने पाचपावली उड्डाणपुलाखाली आणून सोडले. मुलगा कधीतरी घरी परत नेईल, या आशेवर ती जगत आहे. भीक नको, फक्त मुलाकडे पोहोचवून द्या, एवढीच मागणी करीत आहे. मिळेल ते खाऊन ती जगत आहे. मातृदिनानिमित्त ‘सकाळ’ने ‘घरी नेईल... आजही शांतबाईला आस’ हे वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत स्माइल प्लस सोशल फाउंडेशनचे सुमंत ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शांताबाईचा शोध घेतला. तिला आधार देण्यासाठी एक ना अनेक प्रयत्न केले. जिल्हाधिकारी व समाजकल्याण अधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

तीन दिवसांपासून त्यांनी शांताबाईसोबत पाचपावली उड्डाणपुलाखाली राहून रात्रसुद्धा काढली. पायाला मार लागल्यामुळे शांताबाईला धड चालता येत नसल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही केले. शेवटी फाउंडेशनची धडपड यशस्वी ठरली आणि समाजकल्याणच्या वृद्धाश्रमात त्यांना आश्रय मिळाला. यासाठी स्माइल प्लस सोशल फाउंडेशनचे सुमंत ठाकरे, मीनल ठाकरे, चेतन केवलिया, पीयुष उजवणे, स्वप्नील उरमाळे, राहुल देशमुख आणि सोनिया चोपडे यांनी सहकार्य केले.

प्रश्‍न एकट्या शांताबाईचा नाही, तर असंख्य बेवारस आणि मनोरुग्णांचा आहे. यांच्यासाठी काम करताना खूप समस्या येतात. मात्र, दखल घेणारा कुणीच नसतो. त्यांना रुग्णालयात पोहचविण्यासाठी महाराष्ट्रात साधी रुग्णवाहिकासुद्धा नसते. समाजाने यांची दखल घेतली, तर रस्त्यावर एकही बेवारस दिसणार नाही.
- योगेश मालखरे, संस्थापक, स्माइल प्लस फाउंडेशन.

स्माइल प्लस फाउंडेशनने चांगले कार्य केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शांताबाईला निवारा मिळाला. समाजकल्याण विभागातर्फे विविध संस्थांशी बोलून समाजकल्याणच्या एका आश्रमात वृद्ध महिलेची व्यवस्था करून दिली. यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
- सचिन रामटेके, समन्वयक, समाजकल्याण विभाग

Web Title: nagpur news vidarbha news sakal news impact shantabai