दोन तास झुंजून खेचून आणली ‘विजयश्री’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात आज अभूतपूर्व घटना घडली. विजयश्री नरेंद्र बजाज नावाच्या विद्यार्थिनीने तब्बल दोन तास विद्यापीठ प्रशासनासोबत झुंज देऊन सुवर्णपदक हस्तगत केले. या प्रकाराने सारेच अवाक्‌ झाले असून, विद्यापीठाच्या इतिहासात नोटिफिकेशन न काढता प्रथमच पदक प्रदान करण्यात आले. आता हाच नियम इतरांनाही लागू करावा, ही मागणी जोर धरणार असल्याने प्रशासन अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात आज अभूतपूर्व घटना घडली. विजयश्री नरेंद्र बजाज नावाच्या विद्यार्थिनीने तब्बल दोन तास विद्यापीठ प्रशासनासोबत झुंज देऊन सुवर्णपदक हस्तगत केले. या प्रकाराने सारेच अवाक्‌ झाले असून, विद्यापीठाच्या इतिहासात नोटिफिकेशन न काढता प्रथमच पदक प्रदान करण्यात आले. आता हाच नियम इतरांनाही लागू करावा, ही मागणी जोर धरणार असल्याने प्रशासन अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

दीक्षान्त सोहळ्यात सुवर्णपदक मिळणे ही बाब विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये फार गौरवाची असते. प्रथम वर्षापासून तर शेवटच्या वर्षापर्यंत नियमित सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच सुवर्णपदकाचा बहुमान मिळतो. हिस्लॉप महाविद्यालयात शिकलेली विजयश्री बजाज ही एम.ए. मानसशास्त्र विषयात सर्वाधिक ९.५९ ‘सीजीपीए’ असल्याने पदक मिळाल्याचे पत्र विद्यापीठाकडून पाठविण्यात आले. तशी यादीही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. मात्र, या यादीवर राचेल डेनिस पिटर्स या विद्यार्थिनीने आक्षेप नोंदवला. आपणाससुद्धा ९.५९ सीजीपीए असल्याचा दावा तिने केला होता. नियमाप्रमाणे दोन विद्यार्थ्यांना सारखा ‘सीजीपीए’ असल्यास जो विद्यार्थी वयाने लहान असेल त्याला सुवर्णपदक देण्यात येते.

 या नियमानुसार राचेल पिटर्स हिला पदक देण्याचे ठरविले. तसे पत्र राचेल पिटर्स हिला देण्यात आले. मात्र, हा बदल विद्यापीठाने विजयश्रीला कळविला नाही. 

सुवर्ण घेण्यासाठी ती शनिवारी दीक्षान्त सोहळ्यात उपस्थित झाली. यादीत नाव नसल्याने विद्यापीठाने तिला प्रवेश नाकारला. त्यामुळे तिच्या पालकांनी गोंधळ घातला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या भावनांचा खेळ मांडल्याचा आरोप केला. बराच वेळ गोंधळ सुरू असल्याने वेळेवर कुलगुरूंच्या परवानगीने विशेष बाब म्हणून विजयश्री बजाज हिला दुसऱ्याचे पदक देऊन गौरविण्यात आले. यानंतर ते परत घेऊन नव्याने तरतूद करून पदक देण्याचे आश्‍वासन विद्यापीठाकडून देण्यात आल्याचे समजते. 

अनेकांचा ‘सीजीपीए’ सारखा
विद्यापीठाने दोन वर्षांआधी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयानुसार गुणवत्ता यादी ही गुणांच्या आधारे नव्हे, तर ‘सीजीपीए’च्या आधारे तयार करण्याचा निर्णय घेतला. ज्या विद्यार्थ्याचा ‘सीजीपीए’ सर्वाधिक त्याला पदक व पारितोषिक दिले जाते. एकसारखा ‘सीजीपीए’ असल्यास ज्याचे वय कमी त्याला सुवर्णपदक देण्यात येते. विजयश्रीला पदक दिल्याने आता एकसारखा सीजीपीए असलेले अनेक विद्यार्थी पदकावर दावा करण्याची शक्‍यता आहे. 

विजयश्री बजाज हिला विशेष बाब म्हणून पदक देण्यात आले आहे. यामध्ये विद्यापीठाची कुठलीही चूक नाही. सारखा ‘सीजीपीए’ असताना लहान वयाच्या गुणवंत विद्यार्थ्याला ते पदक व पुरस्कार देण्यात येतो.
-डॉ. नीरज खटी, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

दिले आणि परतही घेतले पदक 
बऱ्याच परिश्रमानंतर विजयश्री बजाज या विद्यार्थिनीला विद्यापीठाने समारंभात सुवर्णपदकाने सन्मानित केले. मात्र, तिचा आनंद हा फार काळ टिकला नाही. देण्यात आलेले पदक अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्याचे असल्याने ते काही वेळातच तिच्याकडून परत घेण्यात आल्याची माहिती आहे. या वेळी तिला नव्याने पदक देण्यासाठी विद्यापीठ विशेष तरतूद करणार असल्याची माहिती आहे. 

Web Title: nagpur news vidarbha Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Convention Ceremony