वाहतूक पोलिस शिपायाला खुनाच्या गुन्ह्यात अटक 

वाहतूक पोलिस शिपायाला खुनाच्या गुन्ह्यात अटक 

नागपूर - शहर पोलिस दलातील वाहतूक शाखेच्या चेम्बर वन (एमआयडीसी) मध्ये कार्यरत एका वाहतूक पोलिस शिपायाला वाशीम पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. त्याला न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रवीण केशव पायघन असे अटक करण्यात आलेल्या वाहतूक पोलिस शिपायाचे नाव आहे. या अटकेमुळे वाहतूक शाखेत एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण केशव पायघन हा वादग्रस्त शिपाई होता. तो सध्या वाहतूक शाखेत चेम्बर एकमध्ये कार्यरत असून सध्याही तो वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ‘खास माणूस’ म्हणून काम पाहत होता. प्रवीण हा मूळचा वाशीममधील असून त्याने गेल्या आठ दिवसांपूर्वी अंजनखेडा येथील उपसरपंच बबन भागवत पायघन (वय ५०) यांचा घोडबाबुळ परिसरात शस्त्राने खून केला. या हत्याकांडात त्याने नागपुरातील अमरनगरात राहणाऱ्या ओमप्रकाश दीपक रोहनकर आणि नातेवाईक दीपक कांबळे (रा. तांदळी) यांची मदत घेतली होती. या तिघांनाही वाशीम पोलिसांनी अटक केली. या हत्याकांडासाठी प्रवीण पायघनने नागपुरातील महेश भानुदास मडावी (रा. वानाडोंगरी) याच्या कारचा वापर केला. साप्ताहिक सुटीच्या दिवशी प्रवीणने महेशकडून भाड्याने कार घेतली. कारचालक ओमप्रकाश रोहनकर आणि नातेवाईक दीपक कांबळे यांना हत्याकांडाची योजना सांगितली. नियोजनानुसार तिघांनीही उपसरपंच बबन पायघन यांचा खून केल्यानंतर लगेच ते कारने नागपुरात पोहोचले. तो लगेच दुसऱ्या दिवशी ड्यूटीवर आला. 

नागपूर पोलिसांनी दिले ताब्यात
वाहतूक चेम्बर एकमध्ये कार्यरत असलेला प्रवीण एका चौकात वाहतूक नियंत्रित करीत होता. त्याला पीआय उमेश बेसरकर यांनी फोन करून बोलावून घेतले. चेम्बरमध्ये येताच त्याला हत्याकांडात अटक करण्यास वाशीम पोलिस आल्याचे सांगण्यात आले. त्याला वरिष्ठांच्या आदेशानंतर वाशीम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

प्रवीणवर बलात्काराचाही गुन्हा 
प्रवीण पायघन याने वाशीममधील एका युवतीशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. दरम्यान, ती युवती गर्भवती राहिली. पोलिस असल्याची भीती दाखवून त्या मुलीला प्रवीणने गप्प केले. मात्र, काही दिवसांनंतर या प्रकरणात वाशीम पोलिस ठाण्यात प्रवीण पायघनवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com