देशाभिमान...  बलिदान  आणि अपमान!

देशाभिमान...  बलिदान  आणि अपमान!

नागपूर - देशप्रेम आणि देशाभिमानाने भारावलेले विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यासाठी सुखवस्तू आयुष्याचे बलिदान देतात. तरीही त्यांच्या वाट्याला स्वतंत्र भारतात अपमान आणि अप्रतिष्ठाच येते. मृत्यूलाही न घाबरणाऱ्या सावरकरांना अप्रतिष्ठेने मात्र वेदना  होतात. आपल्या आयुष्यातील रोमांचक प्रसंग सावरकर स्वतः सांगू लागतात तेव्हा श्रोतेही स्तब्ध झालेले असतात. संस्कार भारतीतर्फे आयोजित ‘मृत्युंजय सावरकर’ हा एकपात्री नाट्यप्रयोग यासाठी निमित्त ठरला.

शंकरनगर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित या एकपात्री नाट्यसंहितेचे लेखन कवी अनिल शेंडे यांनी केले होते. तर त्याला रंगमंचावर जिवंत करण्याचे काम सुप्रसिद्ध अभिनेता अनिल पालकर यांनी केले. रंगमंचावर केवळ एकच पात्र असताना प्रेक्षकांना बांधून ठेवणे किती अवघड असते, हे कुणालाही सांगण्याची गरज नाही. त्यातही संवाद रेकॉर्डेड असतील, तर अभिनय आणि संवादांचे टायमिंग सांभाळणे  त्याहीपेक्षा अवघड. पण, अनिल पालकर यांनी या सर्व अडथळ्यांवर मात करून स्वातंत्र्यवीर सावरकर रंगमंचावर जिवंत करण्याचे कसब दाखविले.  सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रकाशयोजनकाराने निभावलेली भूमिका प्रयोगाची उंची वाढविणारी ठरली. अनिल शेंडे यांच्या संहितेतील दमदार आणि तेवढेच प्रभावी संवाद अनेक प्रसंगांना टाळ्यांची उत्स्फूर्त दाद घेऊन जातात. 

मृत्यूला उद्देशून सावरकर आपल्या आयुष्यातील ठळक प्रसंग कथन करीत असतात. ‘क्रांतिकारकांना यमाप्रमाणे अंदमानचे सेल्युलर जेल, काळे पाणी, साखळदंड हे सारे एखाद्या यातना शिबिराप्रमाणे होते. यात अनेकांच्या मनात आत्महत्येचा विचारही आला होता. 

पण, घाबरू नका, उद्या याच ठिकाणी तुमचे पुतळे उभे होतील, असे मी त्यांना सांगितले. दुसरीकडे मला साखळदंडात बघून माई (पत्नी) हादरली होती. शेजारी सोडाच नातेवाईकही ओळख दाखवत नव्हते. याच काळ्या पाण्याच्या शिक्षेत पुस्तके लिहिली तर त्यांच्याही वाट्याला वेदनाच आल्या. पण, माझी पुस्तकेही मृत्यूवर मात करणारी मृत्युंजय ठरली,’ असे सावरकरांचे स्वगत प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा करीत होते. स्वातंत्र्यानंतरही आपल्या पुस्तकांवरील बंदी कायम ठेवल्याबद्दल ते खंत व्यक्त करतात. प्रयोग संपला तेव्हा भारावलेल्या प्रेक्षकांनी सावरकर साकारणारे अनिल पालकर यांच्या कौतुकासाठी रंगमंचावर गर्दी केली. यावेळी संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com