तुम्हाला सत्तेची मस्ती आलीय का ?

तुम्हाला सत्तेची मस्ती आलीय का ?

वर्धा ( कोळझर )  – माझा शेतकरीराजा विष खावून मरत आहे आणि तुम्ही कर्जमाफीची ऐतिहासिक जाहिरातबाजी करत आहात. तुम्हाला सत्तेची मस्ती आलीय का ? असा संतप्त सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी कोळझर येथील सभेत सरकारला केला.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. कुठल्या मुहुर्तावर फडणवीस सरकार आले काय माहित अशी उपाहासात्मक टिका अजित पवार यांनी केली. इथे तुडतुडे काय आले,बोंडअळीने थैमान घातले आणि किटक नाशकामुळे किटक मरण्याऐवजी माणसेच मरत आहे . राज्यातील कुठलाच घटक समाधानी नाही त्यामुळेच सरकारला वठणीवर आणण्यासाठी राष्ट्रवादी सरकारने हल्लाबोल पदयात्रा काढली असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांना संपवण्यासाठी सत्तेत आलात हेच तुमचे अच्छे दिन का ? ही मोघलाई आहे का ? तुम्ही देशाचे मालक झाला आहात का संतप्त सवाल सरकारला अजित पवार यांनी केला.

अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांची सक्षमपणे बाजु मांडण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी करतानाच शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम उभे राहण्यासाठी हल्लाबोल पदयात्रा काढण्यात आल्याचे सांगितले. येत्या १२ डिसेंबरला नागपूर येथे होणाऱ्या हल्लाबोल मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केले.

राज्यातील सरकार निराधार लोकांना मदत करायला तयार नाही.जनतेचा वाली कुणी उरला नाही. सरकार इतके कर्जबाजारी झाले आहे की, ते कुठुन मदत करणार. निव्वळ खोटी आश्वासने देण्यात सरकार धन्यता मानत आहे. सगळया प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करते आहे.त्यामुळे उदयाच्या तरुणपिढीचे जीवन अंधारमय झाले आहे. कुटुंब उध्वस्त होत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमध्ये गुन्हेगारी इतकी वाढली आहे की, नागपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. पोलिसांचे एक एक कारनामे समोर येवू लागले आहेत. पोलिसच माणसांना जिवंत जाळू लागले आहेत. न्याय देणारी माणसंच आम्हाला जाळायला निघाली तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा आहे. सैतानी, हैवानी पोलिसांमध्ये कुठुन आली. आर.आर.आबा यांच्या काळातील पोलिस,जयंत पाटील यांच्या काळातील गृहविभाग आठवा आणि आत्ताच्या फडणवीसांच्या काळातील कायदा आणि सुव्यवस्थेची काय स्थिती आहे हे जनतेने बघावे आणि विचार करावा असा सल्ला अजित पवार यांनी दिला.

या सभेला खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री भास्कर जाधव,माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार विदया चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये,आमदार अमरसिंह पंडीत, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर,माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार गुलाबराव गावंडे,माजी आमदार संदीप बजोरिया,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदींसह पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com