शहरावर पाणीटंचाईचे सावट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

नागपूर - गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने भविष्यात नागपूरकरांवर पाण्याचे संकट निर्माण होण्याची शक्‍यता बळावली आहे. नागपूर शहराला तोतलाडोह डॅमचा बफर डॅम असलेल्या नवेगाव खैरीतून पाणीपुरवठा होतो. परंतु, तोतलाडोह येथील धरणातही जेमतेम ११ टक्के जलसाठा आहे तर संकटाच्या स्थितीत शहराला पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेल्या गोरेवाडा तलावानेही तळ गाठला असून महिनाभरात पाऊस न आल्यास पाणीटंचाई निर्माण होणार आहे. 

जुलै महिन्यात दोन-तीन दिवस पावसाने झलक दाखविली. त्यानंतर पावसाने चांगलीच उसंत घेतली. दररोज आकाशात ढग गोळा होतात, परंतु पाऊस येत नसल्याने वातावरणातही उकाडा निर्माण झाला आहे. पाऊस न आल्यास पुढील वर्षी पिण्यासही पाणी मिळेल की नाही? यावर आता तज्ज्ञांमध्ये चर्चा रंगली आहे. नागपूर विभागातील धरणातील पाण्याची स्थिती भयावह असून  दररोज त्यातून पाण्याचा वापर केला जात आहे. नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नवेगाव खैरी जलाशयाचे प्रमुख धरण असलेल्या तोतलाडोह धरणात आज केवळ ११ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात हे धरण ६८ टक्के भरले होते. तोतलाडोह धरणात कमी पाणीसाठा असल्याने पर्यायाने नवेगाव खैरी या बफर डॅममध्येही पाण्याची पातळी खालावली आहे. सध्या येथून शहराला मुबलक पाणीपुरवठा होत आहे. दररोज या धरणातून शहरात पाणी येत असून या धरणाची पातळी आणखी खाली जात आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास दिवाळीनंतरच  शहरावर पाणीसंकट निर्माण होण्याची शक्‍यता आहे. नवेगाव खैरीतून पाणी न मिळाल्यास शहराला गोरेवाडा तलावाचा मोठा दिलासा मिळतो. परंतु, या तलावातही ३१४ मीटरपर्यंतच पाणी आहे. 

पाच-सहा दिवस पुरेल एवढाच साठा
नवेगाव खैरीतून पाणी न मिळाल्यास गोरेवाडा तलावातून शहराला पाच ते सहा दिवस पाणीपुरवठा होईल, एवढाच साठा आहे. पुढेही पाऊस न पडल्यास नागपूरकरांना पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकावे लागणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ६० टक्‍क्‍यांनी पाणीसाठा कमी असल्याचेही सूत्राने सांगितले. 

गोरेवाडा तलावातून ६५ टक्के शहराला पाणीपुरवठा होऊ शकते. परंतु, या तलावात सध्या पाण्याची पातळी ३१४ मीटरपर्यंत आहे. शहराला पाच ते सहा दिवस पाणीपुरवठा होऊ शकेल, एवढाच साठा आहे. 
- सचिन द्रवेकर, प्रमुख जनसंपर्क अधिकारी, ओसीडब्ल्यू.

Web Title: nagpur news water