अपेक्षांच्या ओझ्याखाली गुदमरतेय बालपण

अपेक्षांच्या ओझ्याखाली गुदमरतेय बालपण

नागपूर - वाढत्या स्पर्धेच्या युगात जो तो अव्वल येण्यासाठी धावतोय. मुलगा जन्माला येण्यापूर्वीच तो काय होणार, हे ठरवून पालक त्या दिशेने वाटचाल करतात. मुलाला स्वत:ला काय व्हायचे आहे, याचा कधी विचारही ते करीत नाहीत. बालपणापासून महागड्या शाळा, शिकवणी लावून आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांचे बालपण चिरडण्याचे काम पालकांकडून सर्रास होत आहे, असा सूर चर्चासत्रात पालकांनी व्यक्‍त केला. 

जागतिक पालकदिनानिमित्त ‘पालकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलांवर दडपण वाढत आहे का?’ विषयावर घेण्यात आलेल्या चर्चेत पालकांनी पालकांच्या मुलांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षाबाबत संताप व्यक्‍त केला. सचिन बोधे म्हणाले, मुलांकडून पालकांच्या वाढत्या अपेक्षांवर चित्रपटातून नेहमी प्रकाश टाकला जातो. तरी पालक यातून काही बोध घेताना दिसत नाही. ‘थ्री इडियट्‌स’, ‘तारें जमीं पर’ या चित्रपटांतून अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्यात आले आहे. तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ओमप्रकाश सोनटक्के म्हणाले, आजचे पालक स्वत:च्या मुलाची बुद्धिमत्ता जाणून न घेता दुसऱ्याच्या मुलाशी नेहमी आपल्या मुलाची तुलना करतात. यात महिला अग्रेसर असून, त्या सतत लहान सहान गोष्टींत मुलांना दुसऱ्याच्या मुलाचे उदाहरण देऊन टोमणे मारतात. हा प्रकार सर्वांत धोकादायक असून, यामुळे मुलगा स्वत:चा आत्मविश्‍वास गमावून बसतो. 

अश्‍विन रडके यांनी लहान मुलांमध्ये चालत असलेल्या चर्चेकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, पहिल्या-दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी वर्गातून बाहेर पडताना त्यांच्यात अभ्यासातून येणाऱ्या तणावाच्या गोष्टी सुरू असतात. या विषयात एवढे मार्क घेतले की बाबा अमूक वस्तू घेऊन देतील, या विषयात चांगले गुण मिळाले नाहीत, तर मला आई रागावेल, आज शाळेचा आणि क्‍लासचा होमवर्क खूप जास्त असून, टेन्शन आले आहे, अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होते. यातून आजचा विद्यार्थी किती तणावात आहे हे लक्षात येते; याकडे त्यांनी लक्ष वेधले. याशिवाय प्रवीण डोईफोडे, सचिन बोंद्रे, नीलेश कोठे यांनीही आपली मते मांडली. 

वाढत्या अपेक्षा रोगट मानसिकता
आजचे पालक मुलांच्या बाबतीत अतिशय जागरूक आहेत. मुलांची प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी ते तत्पर असतात. परंतु, असे केल्याने मुलांमधील आत्मविश्‍वास कमी होतो. पालकांचे वाढते अपेक्षांचे ओझे ही रोगट मानसिकता आहे. पालकांनी मुलांकडून अपेक्षा नक्‍की ठेवाव्या; परंतु त्याची क्षमता लक्षात घेऊनच. स्पर्धा करायची झाली, तर त्यांनी स्वत:शी करावी. वाढत्या स्पर्धेत मुलांना सहभागी करण्याऐवजी त्यांच्यातील वेगळेपण शोधून ते विकसित करण्यावर भर दिला, तर तो नक्‍कीच आयुष्यात यशस्वी होईल, अशी माहिती प्रसिद्ध समुपदेशक राजा आकाश यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com