आमच्यापेक्षा तुम्हाला भरपूर पगार मिळतो

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

नागपूर - आम्हाला फक्त सहा हजार रुपये मानधन मिळते. तरीही आम्ही दिवसरात्र कामे करतो. त्या तुलनेत तुम्हाला भरमसाट पगार मिळतो. त्यामुळे थोडी समाजसेवा केली तर काय बिघडणार आहे? असा सवाल करून महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या शिक्षकांवर हिरव्या व पिवळ्या डस्टबिनची जागृती करण्याची जबाबदारी सोपविली.

नागपूर - आम्हाला फक्त सहा हजार रुपये मानधन मिळते. तरीही आम्ही दिवसरात्र कामे करतो. त्या तुलनेत तुम्हाला भरमसाट पगार मिळतो. त्यामुळे थोडी समाजसेवा केली तर काय बिघडणार आहे? असा सवाल करून महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या शिक्षकांवर हिरव्या व पिवळ्या डस्टबिनची जागृती करण्याची जबाबदारी सोपविली.

महापौरांनी पगार काढल्याने तसेच सुट्यांमध्ये डस्टबिनच्या कामाला जुंपल्याने महापालिका शिक्षकांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. एका शिक्षकावर तब्बल सहाशे घरांची जबाबदारी सोपविली आहे. त्यांना घरोघरी जाऊन हिरव्या आणि निळ्या डस्टबिनमध्ये कुठला कचरा टाकायचा याबाबत मार्गदर्शन करायचे आहे. प्रत्येक कुटुंबाकडून स्वच्छतेविषयीचा छापील अर्ज भरून घ्यायचा आहे. तसेच त्यावर कुटुंबप्रमुखांची स्वाक्षरीसुद्धा घ्यायची आहे. 5 जूनपासून स्वच्छता जागृती मोहीम सुरू करायची आहे. यानंतर डस्टबिन वाटपाचेही काम सोपविले जाणार असल्याने शिक्षक चांगलेच संतापले आहेत. विशेष म्हणजे शिक्षकांना 10 मेपासून सुट्या लागल्या आहेत. यादरम्यान विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे अनुदान थेट बॅंकांमध्ये जमा करायचे असल्याने सुट्या रद्द करून 16 मेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे बॅंक अकाउंट उघडायला लावले. आता सुट्या मिळणार म्हणून अनेक शिक्षकांनी सुट्यांमध्ये फिरायला जाण्याचा बेत आखला. अनेकांनी रिझर्व्हेशन केले.

काल गुरुवारी शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश सर्वांच्या मोबाईलवर धडकला. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता सर्व शिक्षकांची कार्यशाळा असल्याने देशपांडे सभागृहात उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले होते. उपस्थित न राहिल्यास एक दिवसाचे वेतन कापण्यात येईल, अशीही धमकी देण्यात आली. शैक्षणिक कार्यशाळा असल्याने सुमार नऊशे सभागृहात पोहोचले. कार्यक्रमात महापौर, आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांच्यासह महापालिकेचे सर्वच अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. महापौरांनी आपल्या भाषणात पगाराचा उल्लेख करून केलेल्या टिपणीने शिक्षक चांगलेच संतापले आहेत.

आम्ही ऐवजदार आहोत का?
कार्यक्रमानंतर शिक्षकांनी आम्ही ऐवजदार आहोत का? असा संतप्त सवाल केला. महापालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांना सुट्या मिळतात. तेवढ्याच शिक्षकांना मिळतात. मात्र, निवडणूक असो वा कुठलेही काम आले की ते शिक्षकांवर थोपवले जाते. न्यायालयानेसुद्धा शैक्षणिक वगळता इतर कामे शिक्षकांना देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. महापालिका शिक्षक संघाच्या वतीने अध्यक्ष राजेश गवरे यांनीसुद्धा याचा निषेध नोंदवला.

Web Title: nagpur news You get a lot of salary from us