तीन हजारांवर शिक्षक व्हॉट्‌सॲपवरून ‘लेफ्ट’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

सीईओंना निवेदन 
शिक्षक आणि केंद्रप्रमुखांच्या मागणीसाठी सर्व शिक्षक कृती समितीमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिक्षक आणि केंद्रप्रमुखांच्या मागण्याही त्यांचासमोर ठेवून त्यावर चर्चा करण्यात आली.

नागपूर -  जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागासाठी काम करणाऱ्या शिक्षकांनी ऑनलाइन प्रशासकीय कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सोमवारी (ता. २५) घेतला. त्यानुसार शासनाद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘व्हॉट्‌सॲप’ ग्रुपमधूनही जवळपास तीन हजार शिक्षक ‘लेफ्ट’ झाले. आंदोलनाचा फटका अधिकाऱ्यांनाही बसला  असल्याचे समजते. 

जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांवर ऑनलाइन प्रशासकीय कामांची मोठी जबाबदारी आहे. यामध्ये प्रामुख्याने डिजिटल शाळा आणि शाळांची माहिती ऑनलाइन पद्धतीने पाठविण्याचीही जबाबदारी आहे. त्यासाठी जवळपास सर्वच शिक्षकांचे ‘व्हॉट्‌सॲप’ग्रुप तयार करण्यात आले आहे. या ग्रुपच्या आधारे शालेय पोषण आहाराची माहिती, सरल प्रणालीची कामे, विविध तंत्रज्ञान आणि मूल्यशिक्षणासंदर्भातील गोष्टीचे आदानप्रदान केल्या जाते. तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत येणाऱ्या विविध उपक्रमांचाही समावेश आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या बऱ्याच शाळांमध्ये संगणक आणि इंटरनेट सुविधा नाहीत. विशेष म्हणजे ज्या शाळांमध्ये या सुविधा आहेत, त्या शाळांमध्ये ऑपरेटरर्स उपलब्ध नसल्याने त्या सुविधेचा फायदा होताना दिसून येत नाही. यातूनच अनेक शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षकांचे पेमेंट बिल हे पन्नास रुपये प्रतिशिक्षक दराने करीत असल्याची बाब निदर्शनास येते. त्यामुळे शाळास्तरावर सोयीसुविधा देण्यासाठी अनेकदा जिल्हा प्रशासनाला संघटनांकडून निवेदने दिली आहेत. मात्र, त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते. यातून जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या संघटनांनी तयार केलेल्या कृती समितीमार्फत हा बहिष्कार पुकारण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यत तीन हजार शिक्षक शासनातील अधिकाऱ्यांमार्फत तयार करण्यात आलेल्या ‘व्हॉट्‌सॲप’ ग्रुपमधून बाहेर पडले आहेत. अनेक ठिकाणी शिक्षकांनी तयार केलेल्या ग्रुपमधून अधिकाऱ्यांनाच बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बहिष्कारामुळे ऑक्‍टोबर महिन्याचे वेतन बिल मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तयार करणार नाहीत. त्याचा फटका पाच हजारांवर शिक्षकांना बसणार आहे. मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

Web Title: nagpur news zp school teacher left whatsapp