नागपूर : संरक्षण क्षेत्राच्या खरेदी धोरणावर गडकरींची नाराजी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

विदर्भातील पायाभूत सुविधांचा चांगला विकास होत आहे. ब्रॉडगेज मेट्रोचा कारखाना सिंदी रेल्वे येथे लवकरच सुरू होणार आहे. यामुळे या भागातील लहान उद्योगांना चालना मिळणार आहे.

नागपूर : संरक्षण क्षेत्रातील खरेदीची प्रक्रिया प्रचंड क्‍लिष्ट व वेळखाऊ आहे. आठ-आठ महिने निर्णयच घेतले जात नाही. त्यामुळे खरेदीचे धोरणच बदलण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगून केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

वेदतर्फे लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योजकांसाठी चिटणवीस सेंटर येथे आयोजित दोनदिवसीय परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वेदचे अध्यक्ष शिवकुमार राव, माजी अध्यक्ष विलास काळे, देवेंद्र पारेख, सहसचिव राहुल उपगनलावार उपस्थित होते. गडकरी म्हणाले, संरक्षण क्षेत्रातील कार्यप्रणालीमुळे लघू, मध्यम व सूक्ष्म उद्योजकांना वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अडचणी जात आहे. उद्योजकांच्या उत्पादनाला मंजुरी मिळवण्यासाठी एकाच फाइल अनेक टेबलांवर फिरत असते. त्यात आठ ते दहा महिन्यांचा कालावधी जातो. प्रत्यक्ष होकार मिळतो तेव्हा तंत्रज्ञान बदलले असते. त्यामुळे उद्योजक आर्थिक अडचणीत सापडतात. यावर तोडगा काढण्यासाठी संरक्षण विभागाच्या खरेदी धोरणाचा अभ्यास करून त्यात बदल करणे काळाची गरज आहे. 

विदर्भातील अर्थव्यवस्था खनीज, वनपर्यटन, कृषी या क्षेत्रावर आधारित आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून नवीन संशोधन केल्यास या परिसरातील विकास होणार आहे. विदर्भातील पायाभूत सुविधांचा चांगला विकास होत आहे. ब्रॉडगेज मेट्रोचा कारखाना सिंदी रेल्वे येथे लवकरच सुरू होणार आहे. यामुळे या भागातील लहान उद्योगांना चालना मिळणार आहे. स्थानिक बांबू उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी उदबत्तीच्या कच्च्या मालावर 30 टक्के आयत शुल्क लावण्यात आला. त्यामुळे अगरबत्तीसाठी लागणाऱ्या बांबूच्या काड्यांची आयात कमी झाली. परिणामी, स्थानिकांना बांबू उत्पादकांना रोजगार मिळाला आहे. अरुणाचल आणि चीनमधील बांबू विदर्भात लावण्यासाठी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांसोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे असे गडकरी यांनी सांगितले. तत्पूर्वी विलास काळे यांचे भाषण झाले. 

दिल्लीकर बघताय संत्रा बर्फीची वाट 
मदर डेअरीने बाजारात आणलेली संत्रा बर्फीने खवय्यांना भुरळ घातली आहे. त्यामुळे संत्रा बर्फीला नागपूरातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. त्यामुळे दुपारी एकनंतर मदर डेअरीची संत्रा बर्फी शहरातच मिळत नाही. त्यामुळे ती इतरत्र पाठवता येत नसल्याचे सांगत या संत्रा बर्फीची दिल्लीकर वाट पाहात आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, nitin gadkari, defence