मुख्यमंत्र्यांचा फोन, गडकरींनी केली चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

नागपूर : भाजपमध्ये असंतुष्टांची नाराजी दूर करण्याचे सर्व प्रयत्न सुरू झाले असून आज दुसऱ्या दिवशीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बंडखोरांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दूरध्वनीवरून बंडखोरांशी चर्चा केली. काही आमदारही बंडखोरांच्या दारापर्यंत समजूत काढण्यासाठी पोहोचले.

नागपूर : भाजपमध्ये असंतुष्टांची नाराजी दूर करण्याचे सर्व प्रयत्न सुरू झाले असून आज दुसऱ्या दिवशीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बंडखोरांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दूरध्वनीवरून बंडखोरांशी चर्चा केली. काही आमदारही बंडखोरांच्या दारापर्यंत समजूत काढण्यासाठी पोहोचले.

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमधील उमेदवारी न मिळालेल्यांनी नेत्यांवरही नाराजी व्यक्त केली. अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे शस्त्र उपसले. या बंडामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना फटका बसण्याची शक्‍यता लक्षात घेता कालपासून नितीन गडकरी यांनी बंडखोरांची समजूत काढण्यास प्रारंभ केला. आज दुसऱ्या दिवशीही त्यांनी काही बंडखोरांना वाड्यावर पाचारण केले. यात प्रामुख्याने नगरसेवक गोपाल बोहरे यांचा समावेश आहे. शिक्षण समिती सभापती म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली असतानाही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

गोपाल बोहरे यांच्याशी चर्चा करताना नितीन गडकरी यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे पक्षातील सूत्राने सांगितले. जवळपास तासभर बोहरे यांच्याशी गडकरी यांनी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दूरध्वनीवरून सायंकाळी चारच्या सुमारास त्यांची समजूत काढली. त्यामुळे बोहरे आता रिंगणात राहणार की पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी काम करणार? याकडे लक्ष लागले आहे. गोपाल बोहरे यांच्याप्रमाणेच इतरही बंडखोरांना पाचारण करण्यात आले होते. परंतु, ते वाड्यावर आले नसल्याने भाजपच्या आमदारांनी त्यांचे घर गाठले. 

पक्षाच्या एका आमदाराने प्रतिक्रिया व्यक्त करताना ते पक्षाचेच पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी जाण्यात काहीही वावगे नाही, असे सांगितले. पक्षात एक उमेदवार असतो व इच्छुक पन्नास असतात. त्यामुळे 49 जण नाराज होणे स्वाभाविक आहे, असेही या आमदाराने नमूद केले. 

वाड्यावर गर्दी 
मुख्यमंत्र्यांनीही उमेदवारी दाखल केलेल्यांसोबत चर्चा केली. आज दिवसभर वाड्यावर गर्दी होती. सायंकाळी शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार प्रा. अनिल सोले यांनी निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात बैठक घेत पुढील रणनीती तयार केली.

Web Title: Nagpur Nitin Gadkari Devendra Phadnavis Election