पैसा कुठल्या खड्ड्यात मुरतो?

File photo
File photo

नागपूर : महापालिकेच्या हॉटमिक्‍स विभागाकडून दरवर्षी कोट्यवधी खर्च केल्यानंतरही शहरातील खड्डे कायम असते. त्यानंतरही दरवर्षी या विभागाला कोट्यवधी मंजूर केले जात असून नुकताच स्थायी समितीने खडी, डांबर खरेदी व मजूर पुरवठ्यासाठी एकूण 3 कोटी 14 लाखांच्या खर्चाला मंजुरी दिली. विशेष म्हणजे दरवर्षी कोट्यवधींचा निधी हॉट मिक्‍स विभागाला दिला जात असला तरी खड्डे कायम असल्याने हा पैसा कुठल्या खड्ड्यात मुरतो? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
स्थायी समितीने नुकताच झालेल्या बैठकीत हॉटमिक्‍स विभागाचा खडी खरेदी करण्यासाठी 2 कोटी 31 लाख 34 हजार रुपये मंजुरीचा तसेच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मजुरांवरील खर्चाचा 43 लाखांचा, 40 लाखांचा डांबर खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला. एकूण 3 कोटी 14 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली. दरवर्षी हॉट मिक्‍स विभाग रस्त्यांवरील सरासरी 10 हजार खड्डे बुजवित असल्याचे मागील तीन वर्षातील महापालिकेने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवरून दिसून येत आहे. या वर्षी 30 जूनपर्यंत हॉटमिक्‍स विभागाने 1861 खड्डे बुजविले असून 266 खड्डे शिल्लक असल्याचेही माहिती अधिकारातील माहितीत नमूद केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात हॉटमिक्‍स विभाग बंद असतो. ऑक्‍टोबरपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू होणार आहे. अर्थात ऑक्‍टोबर ते मार्च 2019 या आर्थिक वर्षात हॉटमिक्‍स विभागाकडून सरासरी 8 हजार खड्डे बुजविण्यात येणार आहे. 30 जूनपर्यंत बुजविलेल्या 1861 खड्ड्यांवर हॉटमिक्‍स विभागाने इंधन खरेदीसाठी 50 लाख, खड्डे दुरुस्तीसाठी 31 लाख, डांबर खरेदीसाठी 40 लाख, असे एकूण 1 कोटी 21 लाख रुपये खर्च केले. आठ हजार खड्ड्यांसाठी 3 कोटी 14 लाख रुपये मंजूर करण्यात आले. पहिल्या तीन महिन्यांत एका खड्ड्यावर 6501 रुपये तर उर्वरित खड्ड्यांसाठी प्रति खड्डा 3925 रुपये खर्च करण्यात येणार आहे. ही मोठी तफावत असून यात घोळ असण्याची शंका आहे.
दरवर्षी दुरुस्तीवर लाखोंचा खर्च
2016-17 मध्ये हॉटमिक्‍स प्लांटच्या दुरुस्तीसाठी 50 लाख रुपये खर्च करण्यात आले. 2017-18 या वर्षात 34 लाख 84 हजार खर्च करण्यात आला. या वर्षात 30 जूनपर्यंत 3 लाख 66 हजार रुपये खर्च करण्यात आला. दरवर्षी हॉटमिक्‍स प्लांटच्या दुरुस्तीवर एवढा मोठा खर्च करण्यात येत आहे. अशी कुठली यंत्रसामग्री आहे की जी वर्षभरातच नादुरुस्त होते? असा सवाल आहे.
खर्चाचे रजिस्टर गायब
माहिती अधिकारात हॉट मिक्‍स विभागाने 2015-16 ते 2018-19 या वर्षातील माहिती दिली. यात 2015-16 या वर्षातील खर्चाचा अपवाद वगळता सर्व माहिती दिली. मात्र, 2015-16 मधील खर्चाचे रजिस्टर उपलब्ध नसल्याचे या विभागाने स्पष्ट केले. 2015-16 मध्ये स्थायी समिती व आयुक्तांनी केलेल्या तरतुदीची माहिती दिली. मात्र, खर्चाचेच रजिस्टर गायब झाल्याचे नमूद केल्याने या विभागाच्या कार्यप्रणालीवर शंका निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com