जीपीएस घड्याळाचे वाजले बारा

file photo
file photo

नागपूर : सफाई कर्मचाऱ्यांच्या मनगटावर जीपीएस घड्याळ दिल्यास कामचुकारपणावर आळा बसेल, असा महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. कामावर असलेल्या सफाई कर्मचाऱ्याचे लोकेशन चक्क शहराबाहेरचे दाखविण्याचे प्रकार पुढे आल्याने ही यंत्रणाच प्रशासनाची फसवणूक करीत असल्याचे चित्र आहे. या सदोष प्रणालीवर वर्षाला चक्क दोन कोटी खर्च केले जात असून, काही कर्मचाऱ्यांनी जीपीएस घड्याळांना विरोध केला आहे. ऐवजदारांनी तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जीपीएस घड्याळासाठी पालिकेने एजन्सी नियुक्त केली. सुरुवातीला मंगळवारी झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला. 10 सफाई कर्मचाऱ्यांच्या हाताला हे घड्याळ बांधण्यात आले होते. हा प्रयोग यशस्वी ठरल्याचा दावा करीत पालिकेतील कार्यरत 8 हजार 56 सफाई कर्मचाऱ्यांना तसेच निरीक्षक, कनिष्ठ निरीक्षक मुख्यालयातील विभागप्रमुखांना या घड्याळी देण्यात आल्या. मात्र, वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतरही जीपीएस घड्याळ्यातून कर्मचाऱ्याचे लोकेशन ट्रॅक होत नसल्याचे सूत्राने नमूद केले. अनेकदा कर्मचारी कामावर हजर असूनही लोकेशन शहराबाहेरचे दाखविण्यात येत आहे. शिवाय, जीपीएस घड्याळामध्ये बॅटरी असून जोपर्यंत ती चार्ज आहे, तोपर्यंत घड्याळ सुरू असते. सफाई कर्मचारी सकाळी जीपीएस घड्याळ चार्ज करून निघतात. परंतु, बॅटरी "लो' झाल्यानंतर सफाई कर्मचारी कुठे चार्ज करणार, असा प्रश्‍नही अनेक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
मनपात सध्या सुमारे 8 हजारांवर सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. यात 4 हजार 500 ऐवजदार, 36 निरीक्षक, 10 कनिष्ठ निरीक्षक व 130 सुपरवायझरचाही समावेश आहे. प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याला सुमारे 500 मीटरचा रस्ता स्वच्छ करावा लागतो. या कर्मचाऱ्यांवर सफाई निरीक्षक लक्ष ठेवतात. स्वच्छतेची तपासणीही त्यांना करावी लागते. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रति कर्मचारी दरमहा 207 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच याव्यतिरिक्त 18 टक्के जीएसटी दिला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेला प्रत्येक कर्मचाऱ्यावर 244.26 रुपये खर्च करावे लागत आहेत. यामुळे दर महिन्याला 19.54 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. अर्थात, वर्षाला 2 कोटी 34 लाख 48 हजारांचा खर्च होत आहे. साडेतीन वर्षांपर्यंत हा खर्च पालिकेला करावा लागणार आहे. इतका खर्च करूनही ही यंत्रणा अद्याप सक्षम नाही.
अधिकाऱ्यांनी गुंडाळली घड्याळ
महापालिकेतील अनेक अधिकारी, विशेषतः विभागप्रमुखांनीही मनगटाला जीपीएस घड्याळ बांधण्याऐवजी ती घराच्या खुंटीला गुंडाळून ठेवल्याचे चित्र आहे. पालिकेतील अनेक अधिकाऱ्यांच्या मनगटाला ही घड्याळ नाही. त्यामुळे केवळ आम्हीच का बांधावी, असा संतप्त सवालही काही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
सोमवारी ऐवजदारांचे आंदोलन
ऐवजदार कर्मचाऱ्यांनाही जीपीएसयुक्त घड्याळ देण्यात आले आहे. केवळ कंपन्यांना लाभ पोहोचविण्यासाठी ऐवजदारांवर या घड्याळचा प्रयोग केला जात आहे. या घड्याळांविरोधात नागपूर महानगरपालिका ऐवजदार कामगार संघटनेने मोर्चाची तयारी केली आहे. सोमवारी, 29 एप्रिलला मोर्चा महापालिकेत धडकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com