मिनरल पाण्याच्या नावाने अवैध विक्री 

file Photo
file Photo

नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात मिनरल वॉटरच्या नावाने विकले जाणारे पाणी शुद्ध की अशुद्ध, याबाबत मनपा प्रशासनही अनभिज्ञ असल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. या पाण्याने एखादी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करीत सदस्यांनी आरोग्य विभागावर तोंडसुख घेतले. शहरात 132 मिनरल वॉटर कंपन्या असून, यापैकी केवळ 21 कंपन्यांकडेच मनपाचे नाहरकत प्रमाणपत्र असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. 
शहरातील मिनरल वॉटर कंपन्यांकडून गोरखधंदा सुरू असून, पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत नागरिकांचे आरोग्य बिघडत असल्याकडे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सभागृहात प्रश्‍नोत्तराच्या तासात लक्ष वेधले. शहरात मिनरल वॉटरच्या नावाने कार्यक्रम, कार्यालयांमध्ये कॅनने पाणी पोहोचविले जाते. 20 लिटरच्या कॅनसाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात. शुद्धतेच्या नावाखाली बिनधास्तपणे विक्री केली जात असून, पाणी अशुद्ध असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. मनपाच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने हा व्यवसाय चांगलाच फोफावला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केला. आरओ पाणी विक्रेत्यांना मनपाच्या झोनस्तरावरून परवानगी दिली जाते. शहरात 132 ठिकाणी हा व्यवसाय सुरू असून, यातील केवळ 21 व्यावसायिकांनाच पाणी विक्रीचा परवाना दिला असल्याची माहिती सभागृहात अधिकाऱ्यांनी सांगितली. परंतु, अशुद्ध पाणी विक्री होत असेल तर कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेला आहे का? असा प्रश्‍न ज्येष्ठ सदस्य दयाशंकर तिवारी यांनी उपस्थित केला. झोनस्तरावरून परवानगीसाठी जी कागदोपत्री कारवाईची पूर्तता केली जाते, त्या अनुषंगाने किरकोळ कारवाईचा अधिकार मनपाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, कारवाईचा अधिकार अन्न व औषध विभागाला असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित प्रश्‍नावर प्रशासनाकडे उत्तराचा अभाव आणि एकदाही पाणी नमुन्याची चाचणी न करण्याचा प्रताप सभागृहात चांगला संतापजनक ठरला. माजी महापौर प्रवीण दटके, मनोज सांगोळे, प्रफुल्ल गुडधे पाटील आदींनी चर्चेत भाग घेत अपुऱ्या माहितीमुळे हा प्रश्‍न पुढील सभेत मांडण्याची परवानगी महापौरांना मागितली. महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाने पुढील सभेत माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवावी, असे निर्देश देत विषय स्थगित ठेवला. 
"वॉटर एटीएम'चे दर कुणी ठरविले? 
शहरातील नागरिकांना स्वस्त दरात फिल्टर वॉटर पाणी मिळावे याकरिता वॉटर एटीएम सुरू करण्यात आले, ही बाब स्तुत्य आहे. परंतु, एटीएमच्या पाण्याचे दर कसे आणि कोणी ठरविले, असा गुडधे यांनी उपस्थित केला. वॉटर एटीएमसाठी कार्ड वितरित करण्यात आले. हे कार्ड, कोणाला आणि किती देण्यात आले. ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांना पाणी पिण्याची पर्यायी व्यवस्था काय आहे, अशा प्रश्‍नांची सरबत्तीच गुडधे यांनी लावली. प्रशासनाकडील माहितीच्या अभावामुळे हा प्रश्‍न स्थगित ठेवण्याची मागणी त्यांनी केली. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com