मुख्यमंत्र्यांच्या क्षेत्रात सर्वाधिक धार्मिक स्थळे भुईसपाट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

नागपूर : महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध केलेल्या कारवाईत दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघ आघाडीवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्षेत्रात 54 अनधिकृत धार्मिक स्थळे भुईसपाट करण्यात आली.

नागपूर : महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध केलेल्या कारवाईत दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघ आघाडीवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्षेत्रात 54 अनधिकृत धार्मिक स्थळे भुईसपाट करण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर महापालिकेने 22 जूनपासून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली. महापालिकेने सुरुवातीला रस्ते, फूटपाथवरील धार्मिक स्थळांवर बुलडोझर फिरवला. त्यानंतर वस्त्यांतील मोकळ्या जागा, सार्वजनिक वापराच्या जागांवर कारवाई सुरू केली. यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत धार्मिक स्थळे भुईसपाट करण्यात आली. त्यामुळे काही दिवसांत जनक्षोभ उसळला. महापालिकेच्या या कारवाईविरोधात सामान्य नागरिक, राजकीय पक्षच नव्हे, तर सत्ताधारीही रस्त्यावर उतरले. महापालिकेने 31 जुलैपर्यंत दहा झोनमध्ये एकूण 158 अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातील लक्ष्मीनगर व धंतोली झोनमधील 54 धार्मिक स्थळांचा समावेश आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईविरुद्ध नागरिकांचे आंदोलनही याच क्षेत्रातून सुरू झाले. सत्तापक्ष नेते संदीप जोशी व माजी महापौर प्रवीण दटके यांनी त्रिमूर्तीनगरातील दत्तमंदिरावर कारवाईला विरोध केला होता. त्यानंतर संपूर्ण शहरातच कारवाईला विरोधाचे सत्र सुरू झाले. महापालिकेने आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व विधानसभाक्षेत्रातील लकडगंज व सतरंजीपुऱ्याच्या काही भागातील 36, आमदार कोहळे यांच्या दक्षिण क्षेत्रातील हनुमाननगर व नेहरूनगर झोनमधील 25, आमदार सुधाकर देशमुख यांच्या पश्‍चिम विधानसभाक्षेत्रातील धरमपेठ व मंगळवारी झोनमधील काही भागातील 22, आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या उत्तर नागपुरातील आशीनगर व मंगळवारी झोनमधील काही भागातील 12 तर आमदार विकास कुंभारे यांच्या मध्य नागपुरात गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमधील काही भागातील 9 धार्मिक स्थळांवर कारवाई केली. याशिवाय नागपूर सुधार प्रन्यासनेही कारवाई केली.

Web Title: nagpur nmc temple news