नागपूर : एक लाखाची लाच घेताना नगर भूमापन अधिकाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

चार ते पाच दिवस जोशी फरार होते. गुरुवारी जोशी कार्यालयात आले असता एसीबीच्या पथकाने त्यांना पकडले.

नागपूर : रिकामा भूखंड एका संस्थेच्या नावे करण्यासाठी एक लाख रुपयाची लाच घेण्याची तयारी दर्शविणाऱ्या भूमिअभिलेख विभागाच्या नगर भूमापन अधिकाऱ्यास एसीबीने अटक केली. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली. या कारवाईमुळे भूमिअभिलेख कार्यालयातील दलाल आणि लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. आश्रय मधुकर जोशी (40) असे या लाचखोर नगर भूमापन अधिकाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडे प्लॉट चौक येथे राहणारे तक्रारदार यांचा बापूनगर येथे वडिलोपार्जित भूखंड होता. हा भूखंड 2693.47 चौरस फुटांचा होता. त्यापैकी 894.47 भूखंडाचा वाद न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला होता. वाढीव जागेसाठी पैशाची देवाणघेवाण 1990 ला बापूनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेकडे झाली आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये तक्रारदाराने 894.47 चौरस फुटांचा भूखंड बापूनगरमध्ये समाविष्ट करण्यासाठी नगर भूमापन अधिकारी क्र. 2 यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जावर काय निर्णय झाला, याची माहिती घेण्यासाठी तक्रारदार आश्रय जोशी यांना भेटले. त्यावेळी जोशी यांनी त्यांना एक लाखाची मागणी केली होती. तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार केली होती.

तक्रार आल्यानंतर एसीबीच्या पथकाने शहानिशा केली असता जोशी यांची पैसे घेण्याची तयारी असल्याचे लक्षात आले. त्यानुसार, 8 नोव्हेंबर रोजी एसीबीच्या पथकाने सक्करदरा येथील क्रिकेट मैदानाजवळ सापळा रचला. जोशी हे पैसे घेण्यासाठी क्रिकेट मैदानाजवळ आले. परंतु, त्यांना संशय आल्याने त्यांनी पैसे न घेता तेथून पळ काढला. त्यानंतर चार ते पाच दिवस जोशी फरार होते. गुरुवारी जोशी कार्यालयात आले असता एसीबीच्या पथकाने त्यांना पकडले. या प्रकरणी सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून आश्रय जोशी यांना अटक केली.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, officer arrested for taking bribe