कांद्याने केले वांधे...किरकोळ बाजारात 110 रुपये किलो

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

घटलेली आवक आणि तुटवडा यामुळे कांद्याने प्रमुख शहरात शंभरी पार केली आहे. याचा फटका शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे.

नागपूर : महिनाभरापासून कांद्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याने कांदा खरेदी सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेली आहे. बाजारात पुन्हा आवक घटल्याने कळमना बाजारात कांद्याला आज विक्रमी 85 रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. यामुळे किरकोळ बाजारात कांदा 110 रुपयांवर पोहोचला असून 150 रुपये किलोवर जाण्याची शक्‍यता आहे. सामान्यांना जानेवारीपर्यंत कांदा रडवणार आहे. 

लांबलेल्या पावसामुळे यावर्षी कांदा पीक धोक्‍यात आले. राज्यात इतर पिकांसह कांद्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे बाजारातील कांद्याची आवक रोडावली आहे. याचा परिणाम शिल्लक कांद्याचा दर वाढू लागला आहे. घटलेली आवक आणि कांद्याचा तुटवडा यामुळे कांद्याने प्रमुख शहरात शंभरी पार केली आहे. याचा फटका शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. सोलापूर येथील बाजारात नवीन कांद्याला आज 110 रुपयांवर तर जुना कांदा 120 रुपयांवर पोहोचला आहे. म्हैसूरमध्ये कांदा 150 रुपये प्रतिकिलोने विकल्या गेला आहे. त्याचे पडसाद राज्यातील सर्वच जिल्ह्यात दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना कांद्याने चांगलेच रडवले आहे. कांदा 110 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावा लागत आहे. 

कळमना बाजारात आज फक्त लहान 20 गाड्या भरून कांदे आले. मागणीच्या तुलनेत आवक फक्त 30 टक्केच आहे. सध्या शहरात औरंगाबाद येथील कांदा असल्याने 80 ते 85 रुपये किलो घाऊक बाजारात दर आहेत. सोलापूर येथून येणाऱ्या कांद्याला 130 रुपयांपेक्षा अधिक दर मोजावा लागण्याची शक्‍यता आहे, असे कांदा विक्रेता मोहम्मद अफताब यांनी सांगितले. 

पावसामुळे नुकसान
तमिळनाडू आणि कर्नाटकमधून सप्टेंबर महिन्यात, औरंगाबाद, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातून डिसेंबर महिन्यात नागपूरच्या बाजारात कांद्याची आवक होते. या परिसरात झालेल्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झालेले आहे. तसेच राजस्थान आणि गुजरातमध्येही कांद्याचे उत्पादन घटल्याने भाव वाढ झाल्याचे अफताब म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, onion price, market