नागपुरात दोन हजार कर्मचाऱ्यांना "टू स्टार'ची आस!

अनिल कांबळे
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

नागपूर : नागपूर पोलिस दलातील तब्बल 2 हजार 200 पोलिस कर्मचारी अजूनही वर्दीवर "टू स्टार' लागण्याच्या आशेवर आहेत. पोलिस अधिकारी बनण्यास पात्र असतानाही केवळ शासनाच्या दफ्तरदिरंगाईमुळे त्यांना आजही हवालदार या पदावर काम करावे लागत आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये सर्वाधिक टक्‍का मुंबईचा आहे.

नागपूर : नागपूर पोलिस दलातील तब्बल 2 हजार 200 पोलिस कर्मचारी अजूनही वर्दीवर "टू स्टार' लागण्याच्या आशेवर आहेत. पोलिस अधिकारी बनण्यास पात्र असतानाही केवळ शासनाच्या दफ्तरदिरंगाईमुळे त्यांना आजही हवालदार या पदावर काम करावे लागत आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये सर्वाधिक टक्‍का मुंबईचा आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2013 मध्ये सरळसेवा भरतीद्वारे खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत राज्य पोलिस दलातून 26 हजार 114 पोलिस कर्मचाऱ्यांनी परीक्षा दिली. 18 हजार कर्मचारी उत्तीर्ण झाले होते. या परीक्षेत गुणवत्ता क्रमानुसार केवळ 2 हजार कर्मचाऱ्यांनाच पोलिस उपनिरीक्षक पदावर घेण्यात आले. तर उर्वरित जवळपास 16 हजार पोलिस कर्मचारी पोलिस अद्यापही पोलिस अधिकारी होण्याच्या आशेवर आहेत. पोलिस दलात सलग 10 वर्षे सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना खात्याअंतर्गत परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक अधिकारी बनण्याची संधी दिली होती. पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेल्या कर्मचाऱ्याला थेट पोलिस उपनिरीक्षक बनण्याची सुवर्ण संधी मिळाली होती. त्यासाठी राज्यभरातून हजारो पोलिस हवालदारांनी वर्दीवर "दोन स्टार' लागतील, ही आशा ठेवत कठीण परिश्रम घेत अभ्यासाची तयारी केली होती. राज्य लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा झाल्यानंतर 18 हजार पोलिस कर्मचाऱ्यांचे नशीब फळफळले आणि अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार झाले. मात्र, शासनाच्या लालफीतशाहीमुळे हवालदारांच्या अधिकारी बनण्याच्या स्वप्नाचा चुराडा झाला. नागपुरातून तब्बल 2 हजार 222 पोलिस कर्मचारी पदाच्या प्रतीक्षेत आहेत. तर सर्वाधिक मुंबईतून 9 हजार 257 कर्मचारी पोलिस उपनिरीक्षक बनण्याची आशा बाळगून आहे.
अनुभवी अधिकारी मिळतील
पोलिस खात्यात नोकरी लागल्यानंतर सलग 10 वर्षे सेवा ही पात्रता पोलिस उपनिरीक्षक पदासाठी ठेवण्यात आली होती. त्यामुळे नायक पोलिस किंवा हवालदारांनी या संधीचे सोने करीत परीक्षा उत्तीर्ण केली. खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करण्याच्या अनुभव कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे जर नागपुरातील 2 हजार 222 कर्मचाऱ्यांना उपनिरीक्षक पद दिल्यास अनुभवी अधिकारी पोलिस खात्याला मिळतील.

परिक्षेत्र पात्र कर्मचारी
मुंबई 9257
नागपूर 2222
नांदेड 1674
औरंगाबाद 2057
गडचिरोली 1099
नाशिक 2246
ठाणे 3602
कोल्हापूर 3883

Web Title: Nagpur police department news