नागपूरच्या पोलिसाचा उत्तर प्रदेशात खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

नागपूर - पुतण्याच्या लग्नाला गेलेल्या नागपूर ग्रामीण पोलिस दलातील एका हवालदाराचा उत्तर प्रदेशातील भंसुरी या गावी खून झाला. अनिल शिवभवन मिश्रा (४८, रा. झिंगाबाई टाकळी) असे  पोलिस हवालदाराचे नाव आहे. ते पारशिवनी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. 

नागपूर - पुतण्याच्या लग्नाला गेलेल्या नागपूर ग्रामीण पोलिस दलातील एका हवालदाराचा उत्तर प्रदेशातील भंसुरी या गावी खून झाला. अनिल शिवभवन मिश्रा (४८, रा. झिंगाबाई टाकळी) असे  पोलिस हवालदाराचे नाव आहे. ते पारशिवनी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. 

अनिल मिश्रा यांचा पुतण्या चेतन याचे लग्न होते. त्यामुळे मिश्रा कुटुंबीय हटवा अब्बासपूर या गावी आले होते. मंगळवारी रात्री मिश्रा कुटुंबीय वरात घेऊन भंसुरी या गावी राहणाऱ्या रामसिया तिवारी यांच्या घरी गेले. रात्री जेवण झाल्यानंतर मध्यरात्रीला लग्न लागले. रात्री उशिरापर्यंत लग्नसोहळा सुरू होता. रात्री एक वाजतानंतर मिश्रा कुणालाच दिसले नाहीत. ते कुठेतरी झोपले असतील असे वाटत होते. बुधवारी सकाळी वधूच्या घरापासून काही अंतरावरील गल्लीत एक व्यक्‍ती पडून होती. त्या व्यक्तीच्या नाकातून आणि तोंडातून रक्त निघत होते. 

मिश्रा कुटुंबीयांना ही माहिती समजताच ते घटनास्थळी आले असता तो मृतदेह अनिल मिश्रा यांचा असल्याचे समजले. त्यामुळे लग्नस्थळी एकच खळबळ उडाली. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, वैद्यकीय अहवालात मिश्रा यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेच्या वेळी मिश्रा यांच्या गळ्यातील सोनसाखळी, अंगठी आणि एटीएम कार्ड बेपत्ता होते. त्याचप्रमाणे हातापायाची नखे काळी पडली होती. गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह नागपूरला आणण्यात आला. मिश्रा यांना पत्नी अंजू, दोन मुले व मोठा आप्तपरिवार आहे. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार पार पडले.

Web Title: Nagpur police murder in Uttar Pradesh