नागपूर : दरवर्षी पन्नास लाख खासगी पॅथॉलॉजीच्या घशात

केवल जीवनतारे
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

रक्तचाचण्या होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होऊ लागली. काही विभागांचे डॉक्‍टर थेट खासगी पॅथॉलॉजीचा रस्ता दाखवीत होते.

नागपूर : राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयाचा पॅथॉलॉजी विभाग 2009 पासून बंद आहे. विशेष म्हणजे, विभागाचे डॉक्‍टर निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी विकृतिशास्त्रातील तज्ज्ञांची नियुक्‍तीच केली नाही. यामुळे येथे होणाऱ्या विविध प्रकारच्या रक्त व इतर चाचण्या बंद पडल्या. यावर उपचार म्हणून कामगार रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णांच्या रक्ततपासणीची गरज पूर्ण करण्यासाठी चक्क खासगी पॅथॉलॉजीच्या तंत्रज्ञांसाठी मार्ग मोकळा करून दिला. आउटसोर्सिंग केल्याने या चाचण्यांसाठी दरवर्षी या रुग्णालयाला सुमारे 50 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा फटका बसत असल्याची माहिती पुढे आली. 

2009 नंतर कामगार रुग्णालयाच्या पॅथॉलॉजी विभागाचे डॉ. नरांजे निवृत्त झाले आणि येथील पॅथॉलॉजी विभागाला टाळे लागले. उपचारादरम्यान रुग्णांच्या रक्तचाचण्या बंद पडल्या. डॉ. नरांजे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर पॅथॉलॉजिस्टची नेमणूक करणे आवश्‍यक होते. परंतु, शासनाने विदर्भातील कामगारांचे आरोग्य सांभाळणाऱ्या या रुग्णालयातील सुविधांकडे दुर्लक्ष केले. रक्तचाचण्या होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होऊ लागली. काही विभागांचे डॉक्‍टर थेट खासगी पॅथॉलॉजीचा रस्ता दाखवीत होते. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा प्रदान करताना त्यांच्या वेतनातून 1.75 टक्के आणि कंपनी मालकाकडून 4.75 टक्के रक्कम कपात करण्यात येते. हा सर्व निधी कर्मचारी विमा महामंडळाकडून राज्य कामगार विमा योजनेच्या तिजोरीत जमा होतो. कामगारांच्या पैशातूनच त्यांना आरोग्यसेवा दिली जात असतानाही एक पॅथॉलॉजिस्ट कामगार रुग्णालयात नेमता येत नाही, हे दुर्दैव आहे. 

कामगारांच्या हक्कावर गदा येत असल्याने कामगार रुग्णालय प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी करून खासगी पॅथॉलॉजी लॅबकडून रक्ततपासणीची सोय करून घेतली. या खासगी पॅथॉलॉजीमध्ये रुग्णांच्या रक्तचाचणीसाठी महिन्याला नागपुरातील कामगार रुग्णालय प्रशासनाला अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च येत आहे. त्यामुळे वर्षाला 50 लाख रुपये खासगी पॅथॉलॉजी लॅबच्या घशात जात आहेत. अनेकदा खासगीचे बिल थकल्यानंतर पॅथॉलॉजी लॅबवर अवलंबून राहावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आउटसोर्स केले  

कामगार रुग्णालयात रक्त व इतर काही चाचण्यांची सोय आहे. मात्र, थायरॉइड व इतर काही गंभीर स्वरूपाच्या चाचण्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्रीची गरज आहे. आता राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन केली आहे. यामुळे यंत्रसामग्रीही येईल. तूर्तास रुग्णहित लक्षात घेत खासगी पॅथॉलॉजीला आउटसोर्स केले आहे. वर्षभरात किती खर्च होतो, हे आज सांगता येत नाही. 
-डॉ. मीना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, कामगार रुग्णालय, नागपूर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, private pathologist