रेल्वेस्थानकावर आढळली 98 जिवंत काडतुसे

File photo
File photo

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडण्यापूर्वीच सोमवारी नागपूर रेल्वेस्थानकावर तब्बल 98 जिवंत काडतुसे आढळून आली. दुपारच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने रेल्वेस्थानकावरील सुरक्षा यंत्रणेसह प्रशासनात खळबळ उडवून दिली.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीमुळे देशात सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्याच टप्प्यात मतदान होणार असल्याने संपूर्ण नागपूर जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. रेल्वेस्थानकावरील यंत्रणेलाही दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेदरम्यानच सोमवारी फलाट क्रमांक सात लगतच्या मेंटनन्स विभागाच्या कार्यालयाजवळील खोलीत ही जिवंत काडतुसे आढळली.
हेल्पर्सना बसण्यासाठी असणाऱ्या या खोलीत कार्यालयीन कागदपत्रेही असतात. नेहमीप्रमाणे कंत्राटी कर्मचारी लीलाधर राऊत (37, रा. मानकापूर, सादीकाबाद) हा खोली साफ करत होता. आलमारीच्या खाली झाडू मारत असतानाच त्याला ही जिवंत काढतुसे आढळली. त्याने लागलीच याबाबत वरिष्ठांना कळविले. यानंतर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिस नियंत्रण कक्षाला सूचना देण्यात आली. सिनिअर सेक्‍शन इंजिनिअर धनंजय काणे यांनीही धाव घेतली. माहिती मिळताच आरपीएफ निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक रवी वाघ, उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, हेड कॉन्स्टेबल गजानन शेळके, रोशन मोगरे यांनी घटनास्थळ गाठून पंचासमक्ष पंचनामा करून काडतूस ताब्यात घेतले. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेदरम्यान मोठ्या प्रमाणात असलेले हा साठा कुठून आला, कुणी आणला आदी अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. लोहमार्ग पोलिसांनी प्रकरणाची नोंद करीत तपास सुरू केला आहे.
नोव्हेंबरमध्ये आढळला होता दारूगोळा
छत्तीसगड, मध्यप्रदेशसह अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुकीदरम्यान 21 नोव्हेंबरलाही नागपूर रेल्वेस्थानकावर दारूगोळा आढळला होता. हिरवट रंगाच्या बॉक्‍समध्ये तब्बल 450 काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. ते साहित्य लष्कराचे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधितांच्या ताब्यात देण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com