नागपूर : शिक्षकाच्या वासनेची दहावीची विद्यार्थिनी बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

उच्चशिक्षित असलेल्यांमधील ही मानसिक विकृती आहे. कुमार वयातील मुलींना जाळ्यात ओढणे सोपे असते. त्या पटकन घाबरून जातात. अशा प्रकाराची सुरुवात कुठेतरी अश्‍लील स्पर्श किंवा बोलण्यातून होते.

नागपूर : दहावीच्या विद्यार्थिनीवर 50 वर्षीय शिक्षकाने पाशवी बलात्कार केला. मोबाईलने व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. ही गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना अजनीत उघडकीस आली. अजनी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून नराधम शिक्षकास अटक केली. साईबल सुनील चौधरी (रा. चिंतामण अपार्टमेंट, एनआयटी गार्डन, त्रिमूर्तीनगर) असे नराधम शिक्षकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 15 वर्षीय मुलगी स्वीटी (बदललेले नाव) अजनीची रहिवासी असून दहावीत शिकते. दहावीत काही विषयांत तिचा अभ्यास झाला नसल्याने पालकांनी तिला बक्‍कळ पैसा भरून साईबल चौधरीच्या क्‍लासमध्ये ऍडमिशन मिळवून दिली. गेल्या तीन महिन्यांपासून ती नियमित ट्यूशनला जात होती. मात्र, शिक्षक साईबल याची नजर स्वीटीवर पडली. शिक्षक तिला एक्‍स्ट्रा क्‍लासच्या नावावर सर्व विद्यार्थी गेल्यानंतर थांबवून ठेवत होता. 15 जुलै रोजी पाऊस असताना तिला क्‍लासमध्ये थांबविण्यात आले. त्यानंतर क्‍लासचे शटर बंद करून तिला शिक्षकाने शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र, स्वीटीने नकार दिला आणि पावसातच घरी जाण्याचा हट्ट करायला लागली. नराधम शिक्षकाने तिचे तोंड दाबून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. शारीरिक संबंधाचा मोबाईलने व्हिडिओ काढला. कुणालाही सांगितल्यास सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. बलात्कार झाल्यामुळे भेदरलेली स्वीटी तीन दिवस ट्यूशन क्‍लासला आली नाही. त्यामुळे त्याने तिला फोन करून ट्यूशन क्‍लासला ये, नाहीतर तुझा व्हिडिओ व्हायरल करतो, अशी धमकी दिली. त्यामुळे ती नियमितपणे क्‍लासला यायला लागली. साईबल चौधरी हा राजरोसपणे तिला एक्‍स्ट्रा क्‍लासच्या नावाखाली थांबवून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. 

अशी आली घटना उघडकीस 
स्वीटीच्या स्वभावात बदल झाला होता. तिची घरात चिडचीड होत होती, तसेच तिने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली होती. प्रकृती खराब झाल्यानंतर आईला थोडा संशय आला. तिने स्वीटीचा मोबाईल चेक केला असता त्यामध्ये शिक्षकासोबत अर्धनग्नावस्थेत तिचे फोटो आढळले. तसेच शिक्षकाने पाठविलेले अश्‍लील मेसेजही दिसून आले. 

अजनी पोलसांचे अपील 
शिक्षक साईबल चौधरी याची वृत्ती लक्षात घेता, ट्यूशन क्‍लासमधील आणखी काही विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पालकांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपापल्या पाल्यांशी चर्चा करायला हवी. कुणी शिक्षकाच्या लैंगिकतेचा बळी असल्यास त्यांनी अजनी पोलिसांशी संपर्क साधावा. मुलीचे नाव गुप्त ठेवून शिक्षकावर कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले. 

पालकांनो सावधान..! 
शिक्षकांसह घरातील नोकर किंवा ड्रायव्हरच्या अत्याचाराचा बळी मुले पडत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. दहावीत असलेल्या मुलीला स्वतःच हिंमत दाखवून पालकांशी अत्याचाराविरोधात बोलता आले नाही, त्यामुळे तिच्यावर सलग तीन महिने बलात्कार झाला. अशा घटनांना मुले बळी पडू नयेत म्हणून पालकांनी पाल्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आणि त्यांच्याशी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. 

मानसिक विकृती 
पालकांनी जर घरातील वातावरण मोकळे ठेवले तर अशा घटनांना वेळीच आळा बसू शकतो. कुणी चॉकलेट किंवा कोल्ड्रिंक दिल्यास नकार द्यायला मुलींना शिकवा तसेच त्यांच्या वागण्यातील बदलांवर लक्ष ठेवा. 
-प्रा. राजा आकाश (मानसोपचारतज्ज्ञ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, rape