धक्कादायक! स्ट्रेचर नसल्याने रुग्णाला नेले फरफटत

टीम ई-सकाळ
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

- स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने बेशुद्धावस्थेत रुग्णाला नेण्यात आले फरफटत.

- नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात घडला हा प्रकार. 

नागपूर : स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने रुग्णाला बेशुद्धावस्थेत फरफटत नेल्याची घटना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात घडली. या प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. रतन रामटेके (रा. नंदनवन, नागपूर) असे फरफटत नेलेल्या रुग्णाचे नाव आहे.

रतन रामटेके हा मनोरुग्ण आहे. त्याला त्याच्या भावाने न्यायालयाच्या आदेशानुसार उपचार करण्यासाठी रुग्णालयात आणले. मात्र, आपत्कालीन विभागाच्या प्रवेशद्वारावर येताच रतन बेशुद्ध पडला. त्यामुळे भावाने स्ट्रेचरसाठी शोधाशोध केली. मात्र, रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात स्ट्रेचर उपलब्ध झाले नाही. एवढेच नाही तर कोणत्याही डॉक्‍टरने या प्रकाराची दखल घेतली नाही. यामुळे तब्बल अर्धा तास प्रतीक्षा करूनही डॉक्‍टर किंवा रुग्णालयाचा कोणताही कर्मचारी आला नाही. त्यामुळे अखेर रतनच्या भावाला इतर नागरिकांच्या मदतीने बेशुद्धावस्थेत प्रवेशद्वारावरून फरफटत न्यावे लागले. 

तब्बल अर्धा तास एखादा मानसिक रुग्ण आपत्कालीन विभागाच्या प्रवेशद्वारावर बेशुद्धावस्थेत पडून असतानाही रुग्णालय प्रशासनाने याची दखल घेतली नाही. या घडलेल्या प्रकाराने रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nagpur Relative Forced To Drag Patient As Stretcher not available