औरंगाबादला नमवून नागपूर उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

नागपूर  : हिमांशू शेंडे, शर्विल बोमनवार व निखिल चौधरीच्या कामगिरीच्या जोरावर यजमान नागपूर संघाने उपांत्यपूर्व लढतीत औरंगाबादचा 32 गुणांनी सहज पराभव करून नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेतर्फे आयोजित राज्य ज्युनियर बास्केटबॉल स्पर्धेच्या 18 वर्षांखालील मुलांची उपांत्यफेरी गाठली. मुलींच्या संघानेही नाशिकचे आव्हान लीलया मोडीत काढून उपांत्यफेरीत प्रवेश निश्‍चित केला.

बजाजनगर येथील नूतन भारत युवक संघाच्या मैदानावर नागपूरने औरंगाबादवर 86-54 गुणांनी मात केली. हिमांशूने सर्वाधिक 23, शर्विलने 21 आणि निखिलने 15 गुण नोंदविले. याशिवाय सिद्धेश कुळकर्णीने 8 गुणांची नोंद केली. औरंगाबादकडून सर्वाधिक 11 गुण सौरव दिपकेने नोंदविले. मध्यांतराला नागपूर संघाकडे 31-30 अशी केवळ एका गुणाची आघाडी होती. सकाळच्या सत्रात नागपूरने सोलापूरला 46-19 गुणांनी नमविले.
मुलींच्या उपांत्यपूर्व सामन्यात नागपूरने नाशिकला 61-12 गुणांनी पराभूत केले. सीया देवधरने 12, आभा लाडने 10, पुर्वी महल्लेने 9 आणि भाग्यश्री कोलवडकरने 8 गुण नोंदवून नागपूरच्या विजयात निर्णायक योगदान दिले. मध्यांतरापर्यंत 39-6 अशी भक्‍कम आघाडी घेणाऱ्या नागपूरच्या मुलींनी आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत उपांत्यफेरी गाठली. मुलींच्या अन्य उपांत्यपूर्व लढतीत पुणे संघाने औरंगाबादला 41-18 गुणांनी मात दिली. विजयी संघातर्फे ओशिन अजनीकरने 10 व सुधिक्षा कुळकर्णीने 8 गुणांची नोंद केली. औरंगाबादकडून मानसी शिंदेने सर्वाधिक 8 गुण नोंदविले. तिसऱ्या अटीतटीच्या उपांत्यपूर्व सामन्यात धुळे संघाने साताऱ्याचा 60-52 गुणांनी पराभव केला. सानिका सिनकरने 16, वैष्णवी हजारेने 11 आणि भक्‍ती लामघेने 8 गुण नोंदविले. सातारा संघाकडून एकाकी झुंज देणाऱ्या श्रृती भोसलेने सर्वाधिक 26 गुणांची नोंद केली. मुलांच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात ठाणे संघाने मुंबई दक्षिण पश्‍चिम संघाला 52-35 गुणांनी नमवून उपांत्यफेरी गाठली. ठाणेकडून आकिब झरीवालाने 16 व अरघा घंटाने 14 गुण नोंदविले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur in semi final