Video : धडाकेबाज "सिंघम' संजय पांडे, अफलातून कामगिरी 

अनिल कांबळे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

आपला मोबाईल फोन हरवला की आपण हताश होतो. पोलिस स्टेशनमध्ये रिपोर्ट देऊनही फारसे काही होत नाही. परंतु, नागपूर गुन्हे शाखेत "सायबर क्राइम'ची धुरा सांभाळताना चोरांचा सिनेस्टाइल मागोवा घेत अवघ्या तीन दिवसांत तब्बल 61 मोबाईल परत मिळवणारे अत्यंत "एनर्जिटिक' आणि "धडाकेबाज' म्हणून ख्याती असलेले नागपूर नगरीचे सिंघम संजय पांडे यांना तब्बल 164 रिवॉर्ड मिळाले आहेत. त्यांच्या अनेक अफलातून कामगिरीमुळे ते सतत चर्चेत राहिले आहेत. 

नागपूर : माणूस तसा रांगडा; पण तेवढाच सहृदय. गावकडचा गडी; पण शहरात तुफान चमकला. खाकी वर्दीने अपराध्यांना सळो की पळो करून सोडणारा; पण नागरिकांचा लाडका सवंगडी झालेला. संजय भिकाजी पांडे त्यांचे नाव. ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील. वडील शेतकरी तर आई प्रभाताई शेतमजूर. दहावी झाल्यानंतर "मिलिटरी'त जाण्याचे त्यांचे स्वप्न. मात्र, मुलाने पोलिस अधिकारी व्हावे, अशी वडिलांची इच्छा. मराठवाडा विद्यापीठातून "बीएस्सी' व "एमबीए' केले. बुद्धिबळ खेळाची आवड असल्याने विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा गाजवली. नोकरीसाठी राज्य सेवेची तयारी सुरू. 1988 मध्ये पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि येथून त्यांचा खऱ्या अर्थाने खाकीतील जबरदस्त प्रवास सुरू झाला. 

दहा वर्षे बंद पडलेली गाडगेबाबांची यात्रा सुरू केली
गोष्ट खल्लार येथील. संत गाडगेबाबा यांचे अमरावती जिल्ह्यातील हे गाव. संजय पांडे येथे ठाणेदार म्हणून रुजू झाले, त्या वेळी तेथील यात्रा मागील दहा वर्षांपासून बंद होती. ज्यांची ख्याती देशभर पसरली आहे, अशा राष्ट्रसंतांची यात्रा बंद का पडावी? त्यांना प्रश्‍न पडला. खोलात शिरल्यानंतर दोन गटांतील वाद असल्याचे कळले. यात्रेला दिवाळीसारखे महत्त्व होते. त्यामुळे ती यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी धडपड केली. दोन्ही गटांतील म्होरक्‍यांना गाडगेबाबांच्या समाधीस्थळी नेऊन वाद संपुष्टात आणला. तेव्हापासून त्या गावात आजपर्यंत गुण्यागोविंदाने निर्विघ्न यात्रा भरते. याचे श्रेय संजय पांडे यांनाच जाते. आपल्या कर्तव्यदक्षतेची अनेक उदाहरणे त्यांनी पुढे निर्माण केली. 
 

Image may contain: 6 people, people smiling, people standing
सतत कर्तव्यावर असलेले संजय पांडे यांना त्यांच्या कुटुंबाचा मोठा आधार असतो. त्यांच्या कुटुंबातील सदस्य. 

संजय पांडेंसाठी का डबडबले वधूपित्याचे डोळे?
अमरावतीमध्ये असताना किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या एका वधूपित्याचे चोरट्यांनी पाकीट मारले. लग्न तोंडावर होते. त्यामुळे तो ठाण्यात रडत होता. पै पै जमा करून मुलीचे लग्न जुळविले. परंतु, पाकीटच चोरी गेल्याने होत्याचे नव्हते झाले. संजय पांडे यांनी परिस्थिती पाहून स्वतःसह सर्व कर्मचाऱ्यांकडून वर्गणी गोळा केली आणि त्या वधूपित्याला किराणा घेऊन दिला. त्यामुळे ते हसत हसत परतले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर कसून तपास केला आणि लग्नाच्या दिवशीच त्यांनी चोर पकडून त्या वधूपित्याला भेट म्हणून त्यांचे पाकीट परत दिले. तेव्हा मुलीला सासरी पाठविण्याच्या तयारीत असताना त्या वधूपित्याचे डोळे संजय पांडे यांच्यासाठी डबडबून आले. 

 

Image may contain: 5 people, people smiling, people standing
संजय पांडे यांच्या प्रयत्नातून साकारलेले नागपूर येथील सोनेगावचे स्मार्ट पोलिस स्टेशन. 

राज्यातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन बनविले
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पांडे यांनी सोनेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार असताना पोलिस ठाण्याचा चेहरामोहरा बदलविला. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठाण्यात बगीचा बनविला. तसेच व्यायाम करण्याचे काही साहित्य ठाण्याच्या परिसरात लावले. फुलझाडे-फळझाडे लावली. पोलिस ठाण्याला स्वच्छ आणि सुंदर बनविले. त्यामुळे सोनेगाव पोलिस ठाण्याला राज्यातील पहिले स्मार्ट पोलिस ठाणे म्हणून पुरस्कारही त्यांच्या कार्यामुळे मिळाला. 

या "खाकी'ला साहित्याचाही गंध
पोलिस विभागात अनेक प्रतिभावंत कलावंत आणि सुप्त गुणांची खाण असलेले अधिकारी आहेत. मात्र, त्या सुप्त गुणांकडे कुणाची दृष्टी न पडल्यामुळे त्यांच्या गुणांना वाव मिळाला नाही. मात्र, नागपूर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक संजय पांडे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतीक असलेल्या खाकीला साहित्याचा गंध दिला आहे. संजय पांडे हे कविता, लेख, मालिका आणि साहित्याचे धनी आहेत. त्यांनी अनेक वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके, शासकीय प्रकाशने आणि पाक्षिकांत महिला सुरक्षा, बालकविता, प्रौढांसाठी लेख, आध्यात्मिक लेख तसेच शेतकऱ्यांवर लेखन करून पोलिस विभागात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

त्यांना आतापर्यंत साहित्य जगताकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच त्यांना मातोश्री प्रतिष्ठान नागपूरतर्फे आयोजित काव्य स्पर्धेत "श्रद्धा' या विषयावर लिहिलेल्या कवितेला प्रथम पुरस्कार मिळाला, हे विशेष. तसेच पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले आहे. कर्तव्यामुळे घराकडे थोडे दुर्लक्ष झाले; पण पत्नी मनीषा ही मुलांची केवळ आई नसून, ती "बाप'सुद्धा असल्याचे ते अभिमानाने सांगतात. "गीताई' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. "अंधारातील दीपस्तंभ' हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. 
 

Image may contain: 1 person, standing and outdoor
आपल्या कामगिरीने चर्चेत आलेले संजय पांडे यांना आता नागपूर मेट्रो रेल्वेचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. 

सध्या बहुचर्चित नागपूर मेट्रो रेल्वेची "खास' जबाबदारी 
सध्या नागपूर पोलिस विभागात असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पांडे यांनी शहर पोलिस दलात महत्त्वाची कामगिरी बजावून सेवा दिली आहे. त्यांचा मृदू स्वभाव आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपास करण्याचे कसब यामुळे पोलिस निरीक्षक संजय पांडे यांना मेट्रो रेल्वेमध्ये वरिष्ठ सुरक्षा अधिकारी पदावर काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. आज गेल्या वर्षभरापासून मेट्रोच्या रेल्वेच्या सुरक्षेची धुरा यशस्वीपणे ते सांभाळत आहेत.

Image may contain: outdoor
पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजीही संजय पांडे यांना आहे. त्यातूनच त्यांनी सोनेगाव पोलिस ठाण्याच्या परिसरात "ओपन जीम' सुरू केले. 

अनेक सन्मानाचे धनी
सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान केल्याबद्दल 26 जानेवारी 2016 ला पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सत्कार करण्यात आला होता. संजय पांडे यांना आतापर्यंत 164 रिवॉर्ड आणि 35 प्रशस्तिपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांनी नागपूर पोलिसांना 2007 मध्ये "आयएसओ' प्रमाणपत्र मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका वठवली. नागपूर पोलिसांचे "टेक एक्‍स्पो प्रदर्शन'मध्ये पांडे यांच्या ट्रॅफिक विभागाच्या स्टॉलला नुकताच प्रथम पुरस्कार मिळाला.
संजय पांडे यांनी आतापर्यंत 106 शाळा-महाविद्यालये आणि अन्य संस्थांमध्ये व्याख्याने देऊन जनजागृती केली. ते सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असून, त्यांनी पोलिस मित्रांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. 

संजय पांडे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक : 9823019158
सिंघम संजय पांडे यांची स्टोरी कशी वाटली, जरूर कळवा. मेल anil.kamle@esakal.com

 

चल ना मित्रा (संजय पांडे यांची मार्मिक कविता) 

चल ना मित्रा तुला 
पोलिस दाखवतो 
जो तो बघ कसा 
त्याच्यावर रागावतो।। 

बघ तरी तो पोलिस 
रस्त्यावर कसा खातो 
डबा खाताना बघ ना 
त्यात कचराही जातो।। 

अरे तिकडे तर सदा 
पोलिस असतो तैनात 
म्हणून तर सारी जनता 
झोपत असते चैनात।। 

रात्रभर जागून बिचारा 
आता कुठे तो पडलाय 
इतक्‍यात कोणीतरी रे 
त्याचा फोटो काढलाय।। 

पोलिस झोपलाय हे 
तर साऱ्यांनी पाहिलंय 
पण सतत अठरा तास 
राबतोय हे कुठे पाहिलंय।। 

चल ना रे मित्रा तुला 
पोलिस बाप दाखवतो 
कशा कष्टात मुलाला 
पोलिस दादा वाढवतो।। 

पालक सभेत पोलिस 
कधी तरी तुला दिसतो? 
मुलाच्या आईचाच तर 
नेहमी सहभाग असतो।। 

बघ तरी डोळे उघडून 
कसा उभा आहे उन्हात 
पोटात काही नसूनही 
बंदोबस्ताला आहे तैनात।। 

अजून थोडे घे ना श्रम 
पोलिसांची तब्येत पहा 
खाणे झोपणे असे अवेळी 
म्हणे आरोग्यपूरक रहा।। 

कसा ठेवेल सांग ना तो 
तब्येतीचा ताळमेळ 
झोप अन्‌ जेवणाचीच 
नसेल काही काळवेळ।। 

चल ना रे पोलिसाचे 
हेही पहा ना रूप 
नसतानाही चूक 
कसा बसतो चूप।। 

मित्रा तू तरी कधी 
मान्य केलीस का चूक 
जेव्हा तोडता सिग्नल 
पोलिस म्हणतो रुक।। 

पोलिसांशी अनेकांना 
पाहिले करताना वाद 
कधी मित्रा पोलिसांना 
दिले का धन्यवाद?।। 

मित्रा सहानुभूती मिळावी 
ही बिलकुल नाही अपेक्षा 
बस कारणाशिवाय नको 
करू पोलिसांची उपेक्षा।। 

-संजय पांडे, नागपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur "Singham" Sanjay Pandey interview