
जगभरात हे सूर्यग्रहण भारतात सर्वाधिक चांगले दिसणार आहे. नागपुरात 60 टक्के कंकणागृती ग्रहण दिसेल.
नागपूर : या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण महिनाअखेरीस म्हणजेच 26 डिसेंबर 2019 रोजी सकाळी आठ ते दुपारी अकरा या वेळेत "कंकणाकृती सूर्यग्रहण' अर्थात रिंग ऑफ फायर दिसणार आहे. निसर्ग व अंतराळाशी नाते जोडणारी ही दुर्मिळ संधी देशवासींसह नागपूरकरांनासुद्धा अनुभवायला मिळणार आहे.
शहरातील रामन सायन्स केंद्रातर्फे सुरक्षित सूर्यग्रहण पाहता यावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांसाठी पुढील आठवड्यापासून मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. गुरुवार, 26 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून 30 मिनिटांनी सूर्यग्रहणाला सुरुवात होणार असून, सकाळी 11.06 मिनिटांपर्यंत चालणार असल्याची माहिती रामन सायन्स केंद्रातील महेंद्र वाघ यांनी दिली. जगभरात हे सूर्यग्रहण भारतात सर्वाधिक चांगले दिसणार आहे. नागपुरात 60 टक्के कंकणागृती ग्रहण दिसेल.
रामन सायन्स केंद्रात सूर्यग्रहण सुरक्षितरीत्या बघता यावे यासाठी टेलिस्कोपद्वारे पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय सूर्यग्रहण पाहण्यासाठी घरच्या घरी गॉगल्स तयार करण्याबाबत मार्गदर्शन, सूर्यग्रहणाचा पीपीटी शो आदींचे आयोजन रामन सायन्समध्ये करण्यात येणार आहे. 26 डिसेंबर रोजी दिसणारे सूर्यग्रहण हे 2019 या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण असेल.
दक्षिण भारतातून केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतील काही शहरांतून दुर्मिळ असे कंकणाकृती, तर उर्वरित भारतातून ते खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. ग्रहणाची सुरवात कतार, सौदी अरेबिया येथून भारतीय वेळेप्रमाणे सकाळी 8 वाजता होईल, तर भारतातून 8 वाजून 10 मिनिटांनी ग्रहणाला सुरवात होइल. 11 वाजून 10 मिनिटांनी ग्रहणाची समाप्ती होईल. हे वर्षांतील शेवटचे सूर्यग्रहण असून 2020 मध्ये 21 जूनला पुन्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.
महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून 60 ते 70 टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. खंडग्रास ग्रहणाची सुरवात 26 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजून 59 मिनिटे 53 सेकंदांनी होईल. खग्रास ग्रहणाची सुरुवात 9 वाजून 4 मिनिटे 33 सेकंदांनी होईल. ते साडेबारा वाजता संपेल. तर खंडग्रास ग्रहणाचा शेवट 1 वाजून 35 मिनिटांनी होईल. विदर्भ, महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी 08.10 वाजेपासून दिसेल, 09.32 वाजता ग्रहणमध्य असेल, तर 11 वाजता ग्रहण समाप्ती होईल.
कंकणासारखी प्रकाशाची कडा
कंकणाकृती सूर्यग्रहण हे दरवर्षी दिसत नाही. नियमित दिसणाऱ्या खग्रास ग्रहणावेळी पृथ्वी आणि चंद्रातील अंतर कमी असते. त्यामुळे चंद्र, सूर्याचे बिंब हे सारखेच दिसते. म्हणून सूर्यबिंब हे चंद्रबिंबाने झाकले जाते. परंतु कंकणाकृती ग्रहणावेळी चंद्र आणि पृथ्वीचे अंतर जास्त असते. तेव्हा सूर्यबिंब मोठे आणि चंद्रबिंब लहान असते. त्यामुळे चंद्रामुळे सूर्यबिंब पूर्ण झाकले जात नाही. त्यामुळे कंकणासारखी प्रकाशाची कडा दिसते, त्यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.