गोशाळेचे उत्पादन ६५ लिटरवरून पोहोचवले ८५ लिटरवर, नागपुरातील विद्यार्थ्याची भन्नाट आयडीया

nagpur student vivek darwai RAMHI technology increase cowshed in nagpur
nagpur student vivek darwai RAMHI technology increase cowshed in nagpur

नागपूर : नियोजन, व्यवस्थापनाला तंत्रज्ञानाची जोड देऊन विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील पीएच.डी. स्कॉलर विद्यार्थ्याने तोट्यात चालणाऱ्या गोशाळेला संजीवनी दिली आहे. त्यांच्या 'रामही' (Resource-Alternate Revenue-Manpower-Herd-Infrastructure) तंत्रज्ञाने ६५ लिटर दूध देणाऱ्या गोशाळेचे दुधाचे उत्पादन ८५ लिटरवर गेले आहे. याशिवाय जोडधंद्यातून नवे उत्पन्नाचे स्रोतही हाती लागले आहेत. 

गोशाळांना अनेक समस्यांमधून जावे लागते. अनेकदा योग्य नियोजनाच्या अभावामुळे त्याच्या उत्पादनात घट होताना दिसून येते. त्यातूनच गेल्या अडीच वर्षापूर्वी 'मेरीनो इंडिया लिमिटेड'चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश लोहिया यांनी डॉ. सचिन मांडवगणे यांना संपर्क साधून, गेल्या पाच वर्षात गोशाळेत अधिकचा पैसा टाकूनही त्यातील उत्पादन घटत असल्याची तक्रार केली. त्यांची अडचण समजावून घेत, विवेक दरवई याने डॉ. सचिन मांडवगणे यांच्या मार्गदर्शनात ती समस्या सोडविण्याचा विडा उचलला. गोशाळेचे निरीक्षण करून त्यातील व्यवस्थापनाचा सूक्ष्म अभ्यास केला. त्यातून नेमक्या काय समस्या आहेत, त्याची माहिती मिळाली. त्यानुसार अनुत्पादक गाईंना बाहेर काढून ज्या गाईंची उत्पादन क्षमता चांगली होती, त्यांच्या अभ्यासास सुरुवात केली. यात प्रामुख्याने गाईंचा आहार, त्यांच्या गोठ्यातील सुविधा, त्यांचा प्रजननाचा कालावधी आणि त्याचे संगोपन यावर विशेष भर दिला. त्यातून गाईचे आरोग्य सुधारले, शिवाय, दुधात वाढ झाली, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढली, तसेच व्यवस्थापनावरील ताण थोडा कमी झाला. त्यामुळे एका वर्षाच्या कालावधीत दुधाचे उत्पादन ६५ लीटरवरून ८५ लीटरवर गेले. तसेच चाऱ्यावर लागणारा ३० टक्के खर्चही कमी झाला. इतर उत्पादन म्हणून डॉ. मांडवगणे यांनी शेणापासून मच्छर कॉईल, गांडूळ खत आणि गोमूत्रापासून कीटक नियंत्रक तयार केले. 'रामही' हे तंत्र गाझियाबाद येथील हापूड या ठिकाणी असलेल्या गोशाळेमध्ये वापरण्याचे काम सुरू आहे. 

गोशाळेसाठी वापरण्यात येणारे हे प्रभावी तंत्रज्ञान असून त्यामुळे गाईंची दूध उत्पादकता वाढविता येणे शक्य आहे. शिवाय त्यातून इतर उत्पादने तयार करता येतील. 
-विवेक दरवई, पीएच.डी. स्कॉलर, व्हीएनआयटी 

'रामही' हे अभियांत्रिकीचे मूलभूत तत्त्व व्यवस्थापनात वापरून गोशाळा आर्थिक निर्भर करणे हा त्या मागचा उद्देश आहे. 
-डॉ. सचिन मांडवगणे, विभागप्रमुख, रासायनिक अभियांत्रिकी विभाग, व्हीएनआयटी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com