नागपूर @ ४४.२ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्र लाट पसरली आहे.

नागपूर - विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्र लाट पसरली आहे. रविवारी नागपूरच्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ होऊन पारा या मोसमातील उचांकी ४४.२ अंशांवर पोहोचला. तर, चंद्रपूरचे  तापमान विदर्भात सर्वाधिक ठरले. प्रादेशिक हवामान विभागाने येत्या दोन-तीन दिवसांत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्‍यता वर्तविल्याने उन्हाची लाट ओसरण्याची शक्‍यता आहे. 

राजस्थानकडून येणाऱ्या कोरड्या व उष्ण वाऱ्यांमुळे सध्या विदर्भात जोरदार उन्हाची लाट पसरली आहे. लाटेचा सर्वाधिक फटका चंद्रपूरकरांना बसला. चोवीस तासांत येथील कमाल तापमानात एका अंशाची वाढ होऊन पारा ४५ अंशांवर गेला. येथे विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूरच्याही तापमानात जवळपास एका अंशाची वाढ होऊन पारा ४४.२  अंशांवर पोहोचला. यंदाच्या उन्हाळ्यातील हे उचांकी तापमान ठरले. याआधी नऊ एप्रिलला पारा ४४.१ अंशांवर गेला  होता. 

विदर्भातील अकोला (४४.८ अंश सेल्सिअस), ब्रह्मपुरी (४४.७ अंश सेल्सिअस), अमरावती (४४.६ अंश सेल्सिअस), वर्धासह (४३.९ अंश सेल्सिअस) इतरही जिल्ह्यांमध्येही सूर्याचा कहर जाणवला. पावसासाठी सध्या पोषक वातावरण  असल्यामुळे विदर्भात पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाचीही दाट शक्‍यता आहे. काही  ठिकाणी गारपिटीचीही शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

विदर्भातील तापमान 
(अंश सेल्सिअसमध्ये) 
शहर     तापमान

चंद्रपूर     ४५.०
अकोला     ४४.८ 
ब्रह्मपुरी     ४४.७ 
अमरावती     ४४.६   
नागपूर     ४४.२ 
वर्धा     ४३.९ 
यवतमाळ     ४३.० 
गडचिरोली     ४३.० 
बुलडाणा     ४१.६ 
गोंदिया     ४१.२

Web Title: nagpur temperature 44.2