उष्माघाताचे नागपुरात 12 बळी

file photo
file photo

नागपूर : जवळपास एक आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात मागील तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. उन्हाचा तडाखा लक्षात घेता बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागपूरकर सध्या दहशतीत आहेत.
उन्हामुळे दोन दिवसांपूर्वी (शनिवारी) शहरात विविध ठिकाणी चार जण मृत्युमुखी पडले. यात नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे ज्ञानेश्‍वर बाजीराव पेंदाम (वय 60, रा. दिघोरी उड्डाणपुलाजवळ), संघर्षनगर झोपडपट्टी परिसरात 50 ते 55 वयोगटातील अनोळखी व्यक्ती, इतवारी रेल्वे स्टेशनजवळ 35 ते 40 वयोगटातील व्यक्तीसह कळमना परिसरातील लकडगंज येथील साई ट्रेडर्ससमोरील ट्रकच्या ट्रॉलीत अंदाजे 40 वर्षीय भय्या नावाचा व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला. रविवारी उष्माघाताने तीन जणांचा बळी घेतला. गणेशपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील मध्यवर्ती बसस्थानकापुढील दर्ग्याजवळ 55 वर्षीय इसम बेशुद्धावस्थेत आढळून आला. तर कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील मेयोच्या आपत्कालीन विभाग परिसरात 40 वर्षीय अनोळखी व्यक्‍ती मरण पावला. याशिवाय हिंगणा पोलिस स्टेशनअंतर्गत हनुमाननगर परिसरातील एका कडुनिंबाच्या झाडाखाली 30 वर्षीय युवक बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तो मरण पावला.
सोमवारी शहरात उष्माघाताने पाच जण मृत्यूमुखी पडले. यात कळमना परिसरात 58 वर्षीय जितेंद्र नागोसे यांचा ऊन सहन न झाल्याने मृत्यू झाला. इमामवाडा परिसरातील सिरसपेठ येथे राहणाऱ्या 30 वर्षीय अप्पाजी राऊत व अजनी सुजाता बुद्धविहाराजवळ राहणाऱ्या 53 वर्षीय सुशीला बिलोने मृतावस्थेत आढळून आल्या, तसेच मेडिकल रुग्णालयाजवळील सर्जरी अपघात विभागासमोर एक व्यक्‍ती बेशुद्धावस्थेत दिसून आला. नंतर रुग्णालयात भरती केले असता तो मरण पावला. जीपटका भागातही 55 वर्षीय अनोळखी व्यक्‍तीसह 29 वर्षीय प्रतीक्षा लोखंडे उष्माघाताचा बळी ठरली. यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघातामुळे आतापर्यंत मेडिकल, मेयो व अन्य खासगी रुग्णालयांमध्ये 158 जणांचा बळी गेल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आली आहे.
पारा किंचित कमी, चटके कायम
रविवारच्या तुलनेत नागपूरच्या पाऱ्यात आज किंचित घसरण झाली असली तरी, उन्हाचे चटके कायम होते. उन्हामुळे शहरात प्रचंड उकाडा जाणवत असून, अंगातून घामाच्या धारा वाहताहेत. दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. उन्हाच्या तडाख्यापुढे पंखे व कुलर्सदेखील प्रभावहीन ठरत आहेत. सायंकाळी व उशिरा रात्रीपर्यंत उन्हाच्या झळा जाणवत आहेत.
उष्माघातावर घरगुती उपाय
- नियमित थंड पाणी प्यावे
- कांद्याचा रस तळपायाला लावावा
- लिंबूपाणी अधिकाधिक प्यावे
- उन्हात घराबाहेर पडू नये
उष्माघात टाळण्यासाठी
- डोक्‍याला पांढरा रुमाल बांधून घराबाहेर पडावे
- उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नये
- ताप असल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावे
- टरबूज, कांदा, डांगर यांचा अधिकाधिक वापर करावा
विदर्भातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
शहर तापमान
अकोला 46.9
अमरावती 46.8
चंद्रपूर 46.6
वर्धा 45.8
नागपूर 44.8
यवतमाळ 45.5
वाशीम 45.0
बुलडाणा 43.5
गोंदिया 43.0
गडचिरोली 43.0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com