मिहानमध्ये चला जंगल सफारीला, वाघोबा परतले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या मिहान प्रकल्पातही वाघ दिसला आहे. त्यामुळे वाघ आता शहराच्या वेशीवर आल्याचे अधोरेखित झाले आहे.

नागपूर : ख्रिसमसच्या सुट्या जवळच आल्या आहेत. कुठे जायचे यासाठी प्रत्येकाचे नियोजन सुरू असेलच. नागपूरची ओळख संपूर्ण देशात टायगर कॅपिटल म्हणून आहे. त्यामुळे आसपासच्या जंगलांमध्ये पर्यटनासाठी देखील नागपूरकर जातच असतात. जंगल सफारीची आवड असलेल्या पर्यटकांना आता ताडोबा, पेंच, किंवा मेळघाटला जायची गरज नाही. कारण स्वत: वाघोबा नागपूरच्या वेशीवर आले आहेत. होय, काही दिवसांपूर्वी परत गेलेला वाघ पुन्हा मिहान परिसरात दाखल झाला आहे. 

इंफोसिसजवळ तो करतोय "सर्फिंग' 
पंधरा दिवसांपूर्वी मिहान परिसरात आढलेला वाघ पुन्हा परतल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपासून इंफोसिस कंपनीजवळ तो "सर्फिंग' करीत असून अनेकांना त्याचे दर्शनही झाले आहे. त्यामुळे वाघ जंगलाच्या दिशेने निघालेल्याने निश्‍चिंत झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा गस्त वाढवली आहे. 

वन विभागाने वाढवली गस्त 
मिहान प्रकल्पातील इन्फोसिस कंपीच्या मागील बाजूला वाघाने आपला मुक्काम ठोकला असल्याचे उघड झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून वाघ या परिसरात वास्तव्यात आहे. रविवारी आणि सोमवारी सलग दोन दिवसांपासून अनेकांनी त्यास बघितले. या परिसरात अनेक कंपन्या असून कर्मचाऱ्यांचे दिवसभर येणे जाणे सुरू असते. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात वन विभागाने गस्त वाढवली आहे. 

कॅमेऱ्यांद्वारे वाघावर नजर 
शहरापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरील हिंगणा, फेटरी, दहेगाव आणि वडगाव परिसरात गेल्या वर्षी वाघ दिसला होता. आता आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या मिहान प्रकल्पातही वाघ दिसला आहे. त्यामुळे वाघ आता शहराच्या वेशीवर आल्याचे अधोरेखित झाले आहे. मिहानमधील आयटी कंपनीचा सुरक्षा कर्मचाऱ्याला सर्वातप्रथम 16 नोव्हेबर रोजी वाघ दिसला. त्यानंतर हिंगणा आणि सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी वाघांचा मागोवा घेण्यासाठी गस्त वाढवली आहे. तत्पूर्वी वनविभागाने जागोजागी कॅमेरे लाऊन वाघावर नजर रोखली होती. तो हिंगणा परिसरातील जंगलाच्या दिशने निघाला होता. तो आता आपल्या मूळ ठिकाणी जात असल्याने वनविभागाने सुस्कारा सोडला होता. मात्र अचानक तो पुन्हा मिहान परिसरात परतला असल्याने वनकर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, tiger, jungle safari, mihan