‘अ’ दर्जा घ्या, स्वायत्तता मिळवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नागपूर - महाविद्यालयांना स्वायत्ततेच्या संदर्भातील नियमात विद्यापीठ अनुदान आयोगाने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार राष्ट्रीय मूल्यांकन समितीकडून (नॅक) सतत तीन  वर्षे ‘अ’ दर्जा प्राप्त महाविद्यालयाला थेट स्वायत्तता प्रदान करता येईल. याशिवाय महाविद्यालयाला भेट देणाऱ्या समितीत विद्यापीठातील एक सदस्य वगळता इतर सर्वच सदस्य विद्यापीठ अनुदान आयोगाचे राहणार आहेत. 

नागपूर - महाविद्यालयांना स्वायत्ततेच्या संदर्भातील नियमात विद्यापीठ अनुदान आयोगाने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार राष्ट्रीय मूल्यांकन समितीकडून (नॅक) सतत तीन  वर्षे ‘अ’ दर्जा प्राप्त महाविद्यालयाला थेट स्वायत्तता प्रदान करता येईल. याशिवाय महाविद्यालयाला भेट देणाऱ्या समितीत विद्यापीठातील एक सदस्य वगळता इतर सर्वच सदस्य विद्यापीठ अनुदान आयोगाचे राहणार आहेत. 

बऱ्याच वर्षांपासून महाविद्यालयाला स्वायत्तता मिळविण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज करावा लागायचा. त्यानंतर विद्यापीठाकडून एक समिती त्या महाविद्यालयाची तपासणी करण्यासाठी  जायची. या समितीत विद्यापीठाच्या विविध विभागांचे प्रमुख, प्रशासकीय अधिकारी आणि इतर  २१ ते १५ तज्ज्ञांचा समावेश होता. या समितीकडून महाविद्यालयाची संपूर्ण तपासणी केल्यावर त्यासंदर्भातील अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे सोपविण्यात यायचा. त्यानंतर विद्यापीठाद्वारे महाविद्यालयाचा अहवाल विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविण्यात यायचा. 

काही महिन्यांपूर्वी अनुदान आयोगाने विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या अधिकाधिक महाविद्यालयांना स्वायत्तता मिळावी यासाठी नियमात बदल केला. 

यात प्रामुख्याने ज्या महाविद्यालयांना सातत्याने राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेचा (नॅक) ‘अ’ दर्जा मिळत आहे, अशा महाविद्यालयांनी थेट अनुदान आयोगाला अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अनुदान आयोगाची समिती महाविद्यालयांना भेट देईल. ज्या महाविद्यालयांनी आयोगाचे निकष पूर्ण केले, त्या  महाविद्यालयाला स्वायत्तता प्रदान करता येणार आहे. अनुदान आयोगातर्फे महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. 

महाविद्यालयातील अभ्यासक्रमात अधिक लवचिकता राहावी, उद्योगांना तसेच अन्य क्षेत्रात मागणी असलेले मनुष्यबळ महाविद्यालयात तयार व्हावे, गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. विद्यापीठानेसुद्धा महाविद्यालयांना स्वायत्तता प्रदान करण्यास पुढाकार घेण्याचे आदेश यूजीसीने दिले. महाविद्यालयांना मिळणारी स्वायत्ता केवळ शैक्षणिक स्तरावरील असून, आर्थिक बाबींचा यात समावेश नाही.

चार महाविद्यालयांना मिळण्याची शक्‍यता
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील चार महाविद्यालयांना पुढील सत्रापर्यंत स्वायत्तता प्रदान होण्याची शक्‍यता आहे. यात इन्स्टिट्यूट ऑफ सायन्य, जी. एस. वाणिज्य (वर्धा),  शिवाजी विज्ञान आणि जे. बी. सायन्स वर्धा महाविद्यालयांचा समावेश आहे.

Web Title: nagpur university