ना मिळाले पैसे, ना साहित्य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावर सुविधा देण्यासाठी महाविद्यालयांना प्रत्येकी तीन लाख देण्याची कबुली प्रशासनाने दिली होती. त्यामुळे महाविद्यालयांना थेट पैसे न देता, त्यांना साहित्याची खरेदी करून देण्याचे विद्यापीठ प्रशासनाने ठरविले. मात्र, प्रत्यक्षात हिवाळी परीक्षा संपून त्याचे निकालही जाहीर केल्यानंतरही महाविद्यालयांना ना साहित्य मिळाले ना "ई-डिलेव्हरी'नंतर खर्चाचा परतावा. या प्रकाराने महाविद्यालयांमध्ये संताप असून, प्राचार्य फोरम सोमवारी कुलगुरूंची भेट घेणार असल्याचे समजते. 

विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पाच ऑक्‍टोबरपासून सुरू झाल्यात. परीक्षेपूर्वी विद्यापीठाने प्रश्‍नपत्रिकांची "ई-डिलेव्हरी' करण्याची घोषणा केली. त्यावर केंद्र असलेल्या महाविद्यालयांनी ओरड सुरू केली. यासाठी महाविद्यालयाला आवश्‍यक असलेला खर्च देण्याची मागणी केली. त्या खर्चातून केंद्रात झेरॉक्‍स मशीन, लॅपटॉप, नियमित वीजपुरवठा राहावा, यासाठी जनरेटरची खरेदी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यावर विद्यापीठाने प्रत्येक केंद्राला तीन लाख देण्याचे मान्य केले. मात्र, परीक्षा सुरू झाल्यानंतरही महाविद्यालयांना त्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे बऱ्याच केंद्रावर तांत्रिक समस्या निर्माण झाल्यात. शिवाय महाविद्यालयांची साहित्य नसल्याची ओरड कायम होती. यावरूनच विद्यापीठाने स्वत: साहित्याची खरेदी करून केंद्रांना देण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठ परिसरात झालेल्या खरेदी-विक्री समितीच्या बैठकीत केंद्रावर लॅपटॉप, झेरॉक्‍स मशीन, जनरेटरच्या खरेदीसाठी "ई-टेंडरिंग'द्वारे करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी जवळपास चार कोटींचा खर्च येणार आहे. महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होऊन केंद्रांना साहित्य दिल्या जाणार असल्याचे ठरविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ना परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयांना साहित्य पोहोचले, ना पेपरच्या "ई-डिलेव्हरी'करिता महाविद्यालयांनी केलेल्या खर्चाचे पैसेही परत मिळालेले नाहीत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यात महाविद्यालयांचेही योगदान महत्त्वपूर्ण आहे. मात्र, त्याचा भुर्दंड महाविद्यालयाच बसल्याने महाविद्यालयांमध्ये प्रचंड संताप आहे. दुसरीकडे त्यासंदर्भात विद्यापीठाने कुठलीच कारवाई केलेली नाही. 

विद्यापीठाने परीक्षा केंद्रावर लॅपटॉप, झेरॉक्‍स मशीन आणि जनरेटरसाठी पैसे देणार होते. यानंतर विद्यापीठच हे साहित्य खरेदी करून देणार होते. सहा महिन्यांचा कालावधी निघून गेला. अद्याप साहित्यही आले नाही. उलट महाविद्यालयांच्या खिशातून पैसे खर्च झालेत. ते पैसेही अद्याप दिलेले नाही. त्यामुळे सोमवारी यासंदर्भात विद्यापीठातील अधिकाऱ्यांना भेटणार आहे. 
- डॉ. बबनराव तायवाडे, अध्यक्ष, प्राचार्य फोरम. 

Web Title: nagpur university exam center