नागपूर विद्यापीठाने संलग्नता नाकारल्याने 50 हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयातील एमएस्सी रसायनशास्त्र विषयासाठी संलग्नता नाकारल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यापीठाला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. विद्यापीठाविरोधात लक्ष्मणजी मोटघरे चॅरिटेबल ट्रस्टने याचिका दाखल केली.

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयातील एमएस्सी रसायनशास्त्र विषयासाठी संलग्नता नाकारल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यापीठाला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. विद्यापीठाविरोधात लक्ष्मणजी मोटघरे चॅरिटेबल ट्रस्टने याचिका दाखल केली.
याचिकाकर्त्यानुसार, या ट्रस्टतर्फे भंडारा जिल्ह्यातील कोंढा कोसारा (ता. पवनी) येथे महाविद्यालय चालविण्यात येते. महाविद्यालयातील एमएस्सीच्या रसायनशास्त्र अभ्यासक्रमाला 2019-20 या शैक्षणिक सत्राकरिता संलग्नता मिळावी, याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे अर्ज केला होता. एका समितीने महाविद्यालयाचे निरीक्षण करीत विद्यापीठाला अहवाल सादर केला. या समितीने या अहवालात महाविद्यालयामध्ये पात्र शिक्षक नाही. स्वतंत्र प्रयोगशाळा नाही. आवश्‍यक रसायने नाहीत. ग्रंथालयात रसायनशास्त्रासाठी आवश्‍यक पुस्तके नाहीत, आदी निरीक्षणे नोंदवली. त्यामुळे संलग्नता नाकारण्यात आली. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
यादरम्यान, महाविद्यालयाने त्रुटी दूर केल्याचा दावा केला. यासंदर्भात समितीने महाविद्यालयाचे पुन्हा निरीक्षण केले आणि फक्त पुस्कांची त्रुटी दूर झाल्याचा अहवाल दिला. एका तज्ज्ञ शिक्षकाची नियुक्ती करण्यासाठी महाविद्यालयाला वेळ देण्यात आला होता. उच्च न्यायालयाला विद्यापीठाची कृती अनिश्‍चित स्वरूपाची आढळली. त्यामुळे ट्रस्टची याचिका मंजूर करून विद्यापीठाला 50 हजार रुपयांचा खर्च ठोठावण्यात आला. ही रक्कम विधी सेवा समितीकडे जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. ट्रस्टतर्फे ऍड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली. न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur University fined 50 thousand for refusing affiliation