58 महाविद्यालयांची संलग्नता रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नागपूर : विद्यापीठाच्या पत्रव्यवहारांना प्रतिसाद न देणाऱ्या 58 महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीतील निर्णयावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले.

नागपूर : विद्यापीठाच्या पत्रव्यवहारांना प्रतिसाद न देणाऱ्या 58 महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीतील निर्णयावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले.
विद्यापीठाने गुरुवारी सर्व 58 महाविद्यालयांची यादी जाहीर करून त्यांच्याशी विद्यापीठाचा कुठलाही संबंध नाही, असे जाहीर केले. विशेष म्हणजे, यात अनेक नामवंत संस्थांची महाविद्यालये, शारीरिक शिक्षण आणि कला शाखेच्या महाविद्यालयांचा समावेश आहे. जून महिन्यात नागपूर विद्यापीठाने या 256 महाविद्यालयांतील प्रथम वर्ष प्रवेशावर बंदी लावली होती. यातील 98 महाविद्यालयांची संलग्नताच रद्द करण्याचा प्रस्ताव होता. यातील अनेक महाविद्यालयांनी मागील सात ते आठ वर्षांपासून संलग्नीकरणाच्या नूतनीकरणासाठी अर्जच केला नव्हता. यासंदर्भात महाविद्यालयांना पत्रदेखील पाठविण्यात आले होते. यानंतर 11 महाविद्यालयांनी संलग्नीकरण नूतनीकरणासाठी अर्ज केला. मात्र, 58 महाविद्यालयांनी संपर्कच केला नाही; तर उर्वरित महाविद्यालयांनी मागील दोन वर्षांपासून संलग्नीकरणाच्या नूतनीकरणासाठी अर्ज केलेला नाही. या महाविद्यालयांना पुन्हा नोटीस पाठविण्यात आली होती. महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्यासंदर्भात अधिष्ठाता मंडळाने निर्णय घेतला होता. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव विद्वत परिषदेला पाठविण्यात आला होता. त्यानुसार नुकत्याच झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीमध्ये यासंदर्भात चर्चा करण्यात आली. अनेक वर्षांपासून संलग्न राहण्यास इच्छुक नसणाऱ्या या महाविद्यालयांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यापीठाच्या यादीमधून ही महाविद्यालये कायमची वजा झाली आहेत.

Web Title: nagpur university news