विद्यापीठाने विदर्भाचे "ग्रोथ इंजिन' व्हावे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

नागपूर : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. संशोधकांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना मदत करावी. त्यातूनच उद्योगांची संख्या वाढून रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण होतील. मात्र, त्यासाठी नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेत विदर्भाचे "ग्रोथ इंजिन' व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

नागपूर : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. संशोधकांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना मदत करावी. त्यातूनच उद्योगांची संख्या वाढून रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण होतील. मात्र, त्यासाठी नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेत विदर्भाचे "ग्रोथ इंजिन' व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 106 व्या दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सि. प. काणे तर प्रमुख पाहुणे म्हणून "एचसीएल' कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आणि पद्मभूषण शिव नादर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, नागपूर विद्यापीठाने अनेक नामवंत विद्यार्थी देशाला दिले आहेत. त्यांचा वारसा जपत विद्यार्थ्यांनी समाजाला देण्याची वृत्ती जोपासावी. शिव नादर यांनी तेच व्रत हाती घेऊन चाळीस वर्षांपूर्वी "एचसीएल' ही कंपनी सुरू केली. आज त्यांनी विदर्भातील दोन हजारांवर तरुणांना रोजगार दिला. देशाची अर्थव्यवस्था रोजगार निर्माण करणारी असल्यास त्यातून गरिबी हटविण्यास मदत होईल. मात्र, रोजगार वाढविण्यासाठी गुंतवणूक वाढवावी लागेल. केवळ सरकारकडून नोकरीची अपेक्षा न ठेवता, स्वत:च्या कौशल्याने नोकरी देणारे व्हावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यापीठांनीही आपली गुणवत्ता वाढवून देशातील गुंतवणुकीत भर घालण्यास मदत करावी. त्यामुळे देशाचा विकास साधण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, शिव नादर आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते डी. एससी. (डॉक्‍टर इन सायन्स) या पदवीने डॉ. आनंद भोळे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सर्वाधिक सुवर्णपदके पटकाविणारे राघव भांदककर, इशू गिडवानी, मंगेश मेश्राम, मुनमुन सिन्हा आणि सप्तश्रुंगी मोरासकर यांच्यासह इतर पदके व पारितोषिके विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी केले. यावेळी चारही शाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
ज्ञान अद्ययावत करा
आपले जीवन सॉफ्टवेअरप्रमाणे आहे. ते अद्ययावत करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे नवनव्या ज्ञानाने स्वत:ला अद्ययावत करत राहा, असा सल्ला "एचसीएल'चे संस्थापक अध्यक्ष व पद्मभूषण शिव नादर यांनी विद्यार्थ्यांना दिला. सॉफ्टवेअरचे उत्तम डिझाइन तयार झाल्यानंतर ते सुरक्षित ठेवण्यासाठी परिश्रम घेतले जातात. तसेच जीवनाचेही आहे. योग्य व्यवस्थापनासाठी परिश्रम करा, आळस झटकून ज्ञानाचा उपयोग करून आसपासच्या वातावरणात बदल घडवून आणा, असेही आवाहन त्यांनी केले.

Web Title: nagpur university news