सव्वातीन लाख नारळांची दररोज होते विक्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

१५ लाखांची उलाढाल - श्रावण महिन्यात नारळाचे दर वधारले 
नागपूर - सततच्या भाववाढीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना आता श्रावण  महिन्यात पूजेसाठी लागणारे नारळाचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे एका नारळासाठी १५ ते २० रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिनारळ सात ते आठ रुपयांनी महागले आहे. 

१५ लाखांची उलाढाल - श्रावण महिन्यात नारळाचे दर वधारले 
नागपूर - सततच्या भाववाढीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना आता श्रावण  महिन्यात पूजेसाठी लागणारे नारळाचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे एका नारळासाठी १५ ते २० रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिनारळ सात ते आठ रुपयांनी महागले आहे. 

श्रावण महिन्यात धार्मिक कार्यासाठी नारळाची मागणी वाढत असताना भाववाढीने ग्राहकांचा खिसा हलका होणार आहे. उपराजधानीत दररोज सव्वातीन लाखांपेक्षा अधिक नारळांची विक्री होत असून, सरासरी १५ लाखांची उलाढाल होते. यंदा उत्पादन कमी असल्याने शंभर नारळासाठी १,३१० रुपये मोजावे लागत आहेत. गेल्यावर्षी १०० नारळासाठी फक्त ७५० रुपये मोजावे लागत होते. नारळाचे भाव वाढल्याने लोकांच्या आस्थेला महागाईचा चटका बसला आहे. खोबऱ्याचा खिस आणि खोबरा डोलचे भावही वाढले आहेत. मसाल्यामध्ये नारळाचा वापर केला जात असल्याने खाण्याचा आस्वादही थोडा कमी झाला आहे. 

आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळमध्ये यंदा नारळाचे उत्पादन कमी झाल्याने भाव वधारले. त्यात अजून वाढ होण्याची शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली. श्रावण महिन्यात सण आणि धार्मिक कार्य अधिक असतात. आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने भाव वाढले आहेत. 

शहरात दररोज सहा ते सात ट्रक नारळाची आवक सुरू असून पाच ते सहा ट्रक नारळाची विक्री होत  आहे. पाच ते सहा ट्रकमध्ये सरासरी लहान मोठे मिळून तीन लाख नारळ असतात. सध्या शंभर नारळासाठी १,३१० रुपये मोजावे लागत आहेत, अशी माहिती किराणा मर्चंट असोसिएशनचे  माजी अध्यक्ष घनश्‍याम छाबरिया यांनी दिली. श्रावण महिन्यापासून सणासुदीचे दिवस सुरू होतात. यामुळे या महिन्यातच सर्वाधिक नारळाची आवक होत असते. त्यानंतर दिवाळीपर्यंत नारळाची विक्री केली जात असली तरी श्रावण महिनाच नारळाच्या विक्रीसाठी सुगीचा असतो. 

प्रारंभी पावसाने दडी दिल्यामुळे ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांचा उत्साह कमी होता. परंतु, आता पावसाने चांगली हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांची खरेदी वाढली आहे. यामुळे  येत्या काळात नारळाच्या विक्रीत पुन्हा वाढ होण्याची शक्‍यता आहे.
- धनश्‍याम छाबरिया, अध्यक्ष, किराणा मर्चंट असोसिएशन

Web Title: nagpur vidarbha 3.25 lakh coconut daily sailing