स्वाइन फ्लूने चौघे दगावले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

नागपूर - दर दिवसा बदलत्या तापमानात स्वाइन फ्लूचा विषाणू रुळला आहे. शनिवारी नागपुरात स्वाइन फ्लू बाधितांचे चार मृत्यू झाल्याचे उघड झाले. नागपूर विभागात झालेल्या चार मृत्यूंनी मृत्यूचा आकडा ९४ वर पोहोचला आहे. लागणग्रस्तांचा आकडा पाचशेवर आहे.

नागपूर - दर दिवसा बदलत्या तापमानात स्वाइन फ्लूचा विषाणू रुळला आहे. शनिवारी नागपुरात स्वाइन फ्लू बाधितांचे चार मृत्यू झाल्याचे उघड झाले. नागपूर विभागात झालेल्या चार मृत्यूंनी मृत्यूचा आकडा ९४ वर पोहोचला आहे. लागणग्रस्तांचा आकडा पाचशेवर आहे.

चंद्रपूर, बालाघाट, हैदराबाद व छिंदवाडा येथील मृत्यू असून, नागपुरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयात हे मृत्यू झाले आहेत. मृत्युसत्रात प्रचंड वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. परंतु, उपाययोजनेतून स्वाइन फ्लूच्या मृत्यूवर नियत्रंण मिळवण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे. स्वाइन फ्लूच्या बाधेने दगावलेल्या चौघांमध्ये अवघ्या पावणेदोन वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. एका पन्नाशीतील महिलेसहित दोन पंचेचाळिशीतील पुरुष आहेत. सर्वाधिक मृत्यू महिलांचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

शहरातील ३६ मृत्यू
नागपूर विभागात स्वाइन फ्लूने दगावलेल्या व्यक्तींची संख्या ९४ वर पोहोचली आहे. स्वाइन फ्लूबाधितांचा आकडा ४९५ वर पोहोचला आहे. दगावलेल्या रुग्णांमध्ये ३६ रुग्ण शहरातील असल्याची नोंद असताना महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र ढिम्म आहे.

वाडीतील डेंगी मृत्यूंचा आकडा चारवर
वाडीत डेंगीने थैमान घातला आहे. चार लोकांचा मृत्यू झाला असून, ९३ लोक डेंगीने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्‍यातील आरोग्यसेवकांना कामाला लावले आहे. सध्या २६ चमू घरोघरी तपासणी करीत आहेत.

वाडीत घाणीचे साम्राज्य आहे. डासांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकदा तक्रार केल्यावरही कोणतेही उपाय न केल्याने नागरिकांमध्ये रोष व्याप्त होता. यात नवनीतनगरातील उदाराम जयराम कळसकर ५८ या व्यक्तीचा स्वाइन फ्लूने, तर इंद्रायणीनगर येथील १० वर्षीय विद्यार्थिनी आरुषी हेमराज गायकवाडचा डेंगीने मृत्यू झाला. तसेच गत रविवारी चार महिन्यांची अश्‍विनी राहुल बैसचा मृत्यू झाला. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घरोघरी दिलेल्या भेटीत शुक्रवारी ९३ रुग्ण बाधित आढळले. यात सुरक्षानगरमध्ये ५३८ घरी केलेल्या तपासणीत १० रुग्ण, हरिओम सोसायटीमधील २५४ घरी १५ रुग्ण, आंबेडकरनगर येथील ४७८ घरांमध्ये ९, शिवशक्तीनगर येथील ३३८ घरांमध्ये १०, धम्मक्रांतीनगरातील २३१ घरांमध्ये १४, वेणानगर येथील १०३ घरांमध्ये ३ व मंगलधाम सोसायटीतील १०५ घरांमध्ये केलेल्या तपासणीत २८ रुग्ण आढळलेत. आता या भागात जिल्हा परिषदेच्या फॉगिंग मशिनीसह नगर परिषदेच्याही फॉगिंग मशीनने दररोज फवारणी केली जात असल्याचे सांगितले जाते.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ठिकठिकाणी कॅम्प लावले असून, आरोग्यसेवक व डॉक्‍टर दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. बाधित रुग्ण आढळल्यास कॅम्पमध्ये तत्काळ उपचारासाठी आणण्यात येत आहे.
- शरद डोणेकर, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

Web Title: nagpur vidarbha 4 death by swine flu