नागपुरात गुंतवणुकीस फ्रान्सने दाखविली उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

मेट्रो रेल्वे, नागनदीची केली पाहणी - स्मार्ट सिटी प्रकल्पाचीही घेतली माहितीः तांत्रिक सहकार्याची तयारी

नागपूर  - महापालिकेचा स्मार्ट सिटी प्रकल्प तसेच महामेट्रोचा नागपूर मेट्रो प्रकल्पात गुंतवणूक केल्यानंतर फ्रान्समधील आणखी काही कंपन्यांनी शहरातील विविध प्रकल्पांत गुंतवणुकीस तयारी दर्शविली. फ्रान्सच्या पथकाने स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेली  कामे, मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि नागनदीची पाहणी केली. या प्रकल्पांत तांत्रिक सहकार्याची ग्वाही या पथकाने दिली. 

मेट्रो रेल्वे, नागनदीची केली पाहणी - स्मार्ट सिटी प्रकल्पाचीही घेतली माहितीः तांत्रिक सहकार्याची तयारी

नागपूर  - महापालिकेचा स्मार्ट सिटी प्रकल्प तसेच महामेट्रोचा नागपूर मेट्रो प्रकल्पात गुंतवणूक केल्यानंतर फ्रान्समधील आणखी काही कंपन्यांनी शहरातील विविध प्रकल्पांत गुंतवणुकीस तयारी दर्शविली. फ्रान्सच्या पथकाने स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेली  कामे, मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि नागनदीची पाहणी केली. या प्रकल्पांत तांत्रिक सहकार्याची ग्वाही या पथकाने दिली. 

जागतिक स्तरावर संत्रानगरीतील प्रकल्प लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वीच शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पात फ्रान्सने गुंतवणूक केली आहे. भविष्यातही स्मार्ट सिटीच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पांत गुंतवणुकीच्या दृष्टीने आज फ्रान्सचे पथक नागपुरात आले होते. 
या पथकात फ्रान्स सरकारच्या द्विपक्षीय आर्थिक संबंधाचे विशेष प्रतिनिधी पॉल अर्मलीन साऊथ एशिया रिजनल इकॉनॉमिक डिपार्टमेंटचे प्रमुख जॉन मार्क फेनेट, फ्रेंच  डेव्हलपमेंट एजन्सीचे डेप्युटी डायरेक्‍टर हर्व डुब्रेल, टॅक्‍टबिल इंजिनिअरिंग प्रा.लि.चे व्यवसाय विकासप्रमुख ए. एस. भसीन, बिजनेस फ्रान्सचे जेरोम जुलियंड, फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीचे ॲन्टोनी बुज, फ्रान्स दूतावासाचे रूज क्‍लेमेंट, कौन्सिलर जनरल ऑफ फ्रान्स जॉन मार्क  मिगनॉन, फ्रान्स दूतावासाचे अमित ओझा, अल्टोस्टेपचे डेमियन कॅरियर, फ्रान्स दूतावासाच्या कौन्सिलर इलिका खन्ना-मान आदी प्रतिनिधींचा समावेश होता. 

३० सदस्यीय पथकाने तीन गटांत तीन विविध प्रकल्पांची पाहणी केली. एका पथकाने स्मार्ट सिटी प्रकल्पातील एरिया बेस्ड डेव्हलपमेंटअंतर्गत सुरू असलेल्या पारडी-भरतवाडा-पुनापूर येथील कामांची पाहणी केली. त्यांनी एरिया बेस्ड डेव्हलपमेंट कामाच्या प्रगतीबाबत माहिती जाणून घेतली. दुसऱ्या पथकाने नागनदीचा उगम असलेल्या अंबाझरी तलाव ते वर्धमाननगर येथील सेंट झेव्हियर्सपर्यंतच्या नागनदीचा दौरा करीत विकास कार्याची माहिती घेतली.

नागपूर स्मार्ट आणि सुरक्षित बनविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. फ्रान्समधील तंत्रज्ञान आणि अर्थसाहाय्याच्या जोरावर नागपूरला पॅरिससारखे शहर होण्यास कुठेही कमी पडणार नाही. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात योगदान दिल्याबाबत फ्रान्स सरकार आणि फ्रान्स कंपन्यांचे आभार. 
- नंदा जिचकार, महापौर. 

कुठल्याही प्रकल्पासाठी तांत्रिक मदत आवश्‍यक असते. तांत्रिक सहकार्यातून विचारांचे  आदानप्रदान होते. फ्रान्स सरकारने संत्रानगरीपुढे मदतीचा हात पुढे केल्याने नागपूरकरांच्या वतीने आम्ही आभारी आहोत. भविष्यात फ्रान्सकडून सहकार्य मिळत राहील. 
- अश्‍विन मुदगल, आयुक्त.

मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण 
तिसऱ्या चमूने नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कार्याची माहिती घेतली. मेट्रो हाउस येथे सादरीकरणाच्या माध्यमातून मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी दिली. या वेळी महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिलकुमार कोकाटे उपस्थित होते. त्यानंतर शिष्टमंडळाने सेंट्रल मॉल येथील आणि एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्थानकाची तसेच साई मंदिर येथील  व्हायाडक्‍टची पाहणी केली.

नागपूर इंडो-फ्रेंच संबंधाचे प्लॅटफॉर्म - अर्मलीन 
नागपुरातील स्मार्ट सिटी आणि नागपूर मेट्रो प्रकल्पात फ्रान्समधील विविध कंपन्यांची गुंतवणूक आहे. भविष्यात इंडो-फ्रेंच द्विसंबंध अधिक दृढ होण्यासाठी नागपूर प्लॅटफॉर्म ठरेल, असा  विश्‍वास फ्रान्स सरकारच्या द्विपक्षीय आर्थिक संबंधाचे विशेष प्रतिनिधी पॉल अर्मलीन यांनी व्यक्त केला. इंडो-फ्रेंच संबंधाचे नागपूर एक उदाहरण आहे. जगातील इतर शहरे नागपूरपासून प्रेरणा घेतील. नागपुरात इलेक्‍ट्रिक वाहतुकीसाठी फ्रान्सने ३.५० मिलियन युरो अर्थसाहाय्य केले होते. नागपूरच्या विकासासाठी फ्रान्सचे सहकार्य यापुढेही सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

डॉ. सोनवणेंनी दिली स्मार्ट सिटीची माहिती 
स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. स्मार्ट सिटी प्रकल्पात कार्यरत असलेल्या एन. जे. एस. इंजिनिअर्सच्या सोनाली कतरे यांनी नागनदी पुनरुज्जीविकरण प्रकल्पाची, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी नागनदी विकास प्रकल्पाची तर अहमदाबाद येथील एचसीपी डिझाईन, प्लानिंग ॲण्ड मॅनेजमेंटचे प्रकल्प व्यवस्थापक गणेश अहिरे यांनी एरिया बेस्ड डेव्हलपमेंटची माहिती सादरीकरणातून दिली.

Web Title: nagpur vidarbha france interested in nagpur investment