खासदार सांस्कृतिक महोत्सवाची तयारी जोमात; 800 कलाकारांचे एकत्रित सादरीकरण

khasdar cultural mahotsav artist
khasdar cultural mahotsav artist

नागपूर ः खासदार सांस्कृतिक महोत्सव 2019 ची तयारी अंतिम टप्प्यावर आली असून, यासाठी ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर कार्यक्रमाचा सराव सुरू आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार येथील शैलेश दाणी व प्रसिद्ध बासरीवादक अरविंद उपाध्ये यांच्या संयोजनातून तयार झालेल्या "सूर-ताल संसद' या कार्यक्रमाने 29 नोव्हेंबर रोजी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे शानदार उद्‌घाटन होणार आहे.


यानिमित्ताने नागपुरातील 400 वादक, 200 गायक आणि 200 नर्तक असे सुमारे 800 कलाकार पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत. "सिम्फनी ऑर्केस्ट्रा'चा हा देशातला पहिला आणि तितकाच अनोखा प्रयोग यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात पाहायला मिळणार आहे. ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर खास या कार्यक्रमासाठी सुमारे 20,000 चौरस फुटांमध्ये चार लेअरचा भव्य मंच उभारण्यात आला आहे. या मंचावर हे 800 कलाकार सध्या सराव करीत आहेत. "सूर ताल संसद' या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शक शैलेश दाणी करत असून, अरविंद उपाध्ये आणि गजानन रानडे संयोजन करीत आहेत.


दिग्दर्शक दाणी यांनी सूर ताल संसद कार्यक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, नागपुरातल्या सर्व कलाकारांनी एकत्र येऊन काहीतरी सादर करावे, ही मूळ कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची होती. पण त्यांना हा कार्यक्रम गीतांचा नको होता. त्यातून मग असा विचार पुढे आला की वाद्यांचा कार्यक्रम करावा. पण कार्यक्रमाला सर्वच प्रकारचे श्रोते येणार ही बाब लक्षात घेऊन मग त्यात वादन, गायन आणि नृत्याचाही समावेश करण्यात आला. कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरेचा हा सांगीतिक आविष्कार असेल. एरवी गायकांच्या साथीला वादक असतात. पण या कार्यक्रमात वादकांच्या साथीला गायक राहतील. अशाप्रकारचा कदाचित हा पहिलाच कार्यक्रम असेल.

आठ थीममध्ये विभागणी

पावणेदोन तासांच्या या कार्यक्रमाची आठ थीममध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या प्रभात थीममध्ये ओमकार, सूर्यनमस्कार, भूपाळी, ओव्या, वासुदेव आदींचा त्यात समावेश करण्यात आला आहे. संतपरंपरेवर आधारित थीम टाळ, मृदंग, चिपळ्या, हरिनामाचा गजर, दिंडी, अभंग, गवळण, भारुडाद्वारे सादर केली जाणार आहे. महाराष्ट्रातील विविध सणांवरची एक थीम राहणार असून त्यात श्‍लोक, आरती, गणपतीची मिरवणूक, नागपूरची परंपरा मारबत आदींचे दर्शन होईल तर भक्‍तिसंगीताच्या थीममध्ये जोगवा, गोंधळ आदी राहणार आहे. लोकसंगीताच्या थीममध्ये भारुड, धनगर गीत, कोळीगीते तर भावगीतामध्ये लहानपणापासून जे आपल्या भावसंस्कार झालेत त्या गीतांचा समावेश राहील. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा एका थीममध्ये वाद्यांच्या मदतीने सादर केला जाणार आहे. मंगलसंगीताच्या थीममध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत व त्यानंतर ढोलताशा पथक वादन होईल. कार्यक्रमाचा समारोप वंदेमातरम्‌ या गीताने होणार आहे. मूळ पाच कडव्यांचे हे गीत शैलेश दाणी यांनी संगीतबद्ध केले असून या गीतातून राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडणार आहे.

मराठमोळा सिम्फनी ऑर्केस्ट्रा

विविध वाद्यांचा मेळ असलेल्या आणि अगदी तालासुरात वाजणाऱ्या "सिम्फनी ऑर्केस्ट्रा'सारखाच हा आपला मराठमोळा ऑर्केस्ट्रा राहणार आहे. यात विविध 12 वाद्ये मुख्य भूमिकेत राहतील. वाद्यांच्या तालावर गायक कलावंत गाणार आहेत. कार्यक्रमात स्थानिक कलावंताना स्थान देण्यात आले असून, यात नागपुरातील व्यावसायिक आणि हौशी कलाकार सहभागी झाले आहेत. सूर ताल संसद ही संकल्पना देशभरात आजवर कुठेही सादर झाली नाही. याप्रकारचे कार्यक्रम श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनात पार पडतात. परंतु, इतक्‍या भव्य प्रमाणात प्रथमच कार्यक्रम सादर होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनासाठी श्री श्री रविशंकर आपले आशीर्वाद देण्यास उपस्थित राहतील, अशी माहिती खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे समन्वयक अविनाश घुसे यांनी दिली.


अंध आदित्यनेही धरला "ताल'

खासदार महोत्सव 2019 मधील "सूर - ताल संसद' या भव्य कार्यक्रमात 800 कलाकारांमध्ये दक्षिण अंबाझरी रोड येथील अंध विद्यालयाचा बारा वर्षीय अंध विद्यार्थी आदित्य चौरसिया यानेही तबल्यावर ताल धरला आहे. आदित्य गेल्या सात-आठ वर्षांपासून तबलावादन शिकत आहे. त्याने तबल्याच्या तीन परीक्षा पास केल्या असून, तो व्यावसायिक तबलावादक कलाकारांमध्ये सहभागी होऊन, तबला वाजविताना दिसत आहे. खासदार महोत्सवातील कार्यक्रमातही त्याने सहभाग घेत समूहाला साथ दिली आहे. तबलावादन कलाप्रकारात सुमारे 60 कलावंत असून, आदित्य एकटाच अंध विद्यार्थी आहे. त्याचे शिक्षक विवेक लोहकरे हे त्याला यासाठी सहकार्य करीत आहेत. आदित्यला इतर मुलांपेक्षा चारपटींनी लवकर ऐकायला मिळत असल्याने, तो आपल्या आयक्‍यूच्या मदतीने आलेल्या सूचना पाळत असल्याचे लोहकरे यांनी सांगितले.

शिवराज्याभिषेकासाठी 100 ढोल वाजणार

महाराष्ट्रातील सर्वांत मोठी घटना म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा होय. या सोहळा सजीव स्वरूपात सूर ताल संसद कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहे. यासाठी खास 100 ढोल बडवले जाणार असून, शहरातील गजवर्क ध्वजपथक तयारी करत आहे. पथकातील कलावंत यासाठी गेल्या महिनाभरापासून सराव करत असून, यात 25 मुले आणि 75 मुलींचा सहभाग राहणार आहे. 8 ते 30 वयोगटांतील कलावंत ढोल वाजविणार असून, या ढोलपथकामुळे शिवराज्याभिषेकाचा थरारक अनुभव सोहळ्यात उपस्थितांना घेता येणार आहे. ढोल पथकातील आर्जव जैन, अलोक ठाकरे, अविनाश गिऱ्हे, उद्देश कापले ढोल पथकाचे संयोजन करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com