नागपुरातील यकृताचे मुंबईत प्रत्यारोपण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

देशकर कुटुंबाचा अवयवदानाचा आदर्श - ब्रेनडेड व्यक्तीने वाचविला तिघांचा जीव

देशकर कुटुंबाचा अवयवदानाचा आदर्श - ब्रेनडेड व्यक्तीने वाचविला तिघांचा जीव

नागपूर - कुटुंबाचा आधारवड असलेले विनायकराव देशकर यांना डॉक्‍टरांनी मेंदूमृत्यू (ब्रेनडेड) घोषित केले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण, अशा दुःखाच्या वेळी वेळ वाया न दवडता, स्वतःला सावरत मुलांनी अवयवदानाचा निर्णय घेत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. विशेष असे की, नागपुरातील मेंदूमृत विनायकराव यांचे यकृत मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये चार्टर्ड विमानाने पाठविले. गरजूच्या शरीरात चार तासांच्या आत यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करण्यात आले. नागपुरात यकृतदानातून मुंबईत जीव वाचवला. विनायकरावांच्या यकृतासह दोन किडनीदानातून तिघांचा जीव वाचवला. तर, नेत्रदानातून दोन अंध बांधवांच्या डोळ्यांतील अंधार दूर केला. याशिवाय त्वचादानही केले.  

नरेंद्रनगर मधुबन ले-आउटमधील देशकर कुटुंब. कुटुंबासोबत पचमढीला गेले असताना ६७ वर्षीय विनायकराव देशकर कोसळले. त्यांना तत्काळ नागपुरात डॉ. शैलेश पितळे यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले.

हायपरटेन्शन, डायबेटीस, हायपोथारॉईडइझम, ओल्ड सीव्हीई आणि मॅसिव्ह इंट्राकार्सिनल ब्लीड असल्याचे सांगितले. डॉ. संजीव बैस, डॉ. संग्राम वाघ, डॉ प्रमोद गिरी यांनीही उपचार केले. परंतु, उपचाराला शरीर दाद देत नव्हते. हायपरटेन्शन, श्‍वास घेण्यात त्रास वाढला. दरम्यान, मेंदूमृत्यू असल्याचे कुटुंबीयांना कळविले. विनायकराव यांच्या पत्नी गायत्री, मुलगा अभिषेक, अनुराग यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. तत्काळ शासननियुक्त प्रत्यारोपण आणि अवयव रिट्रायवाल युनिटच्या (ओचरी) संचालकांशी डॉ. अनुप मरार यांनी संपर्क साधला. विभागीय अवयव प्रत्यारोपण केंद्राचे सचिव डॉ. रवी वानखेडे तत्काळ हजर झाले. ब्रेन स्टेम डेथ सर्टिफिकेशन समितीच्या डॉ. देवयानी बुचे, डॉ. आर. अटल आणि डॉ. वसंत डांगरा यांनी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. प्रतीक्षा यादीनुसार एक किडनी वोक्‍हार्ट हॉस्पिटलमध्ये तर दुसऱ्या किडनीचे प्रत्यारोपण केअर हॉस्पिटलमध्ये केले. याशिवाय महात्मे आय बॅंकेला नेत्रदान करण्यात आले. या नेत्रदानातून दोन अंधांना बाह्यसृष्टी बघण्याची संधी मिळाली. रोटरीतर्फे चालविण्यात येत असलेल्या ‘त्वचापेढी’ला त्वचा दान करण्यात आली. हृदय, फुप्फुस मात्र दान करता आले नसल्याचे डॉ. रवी वानखेडे यांनी सांगितले.

ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानातून आठ व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करता येतो. गेल्या काही वर्षांत अवयवदानाबाबत झालेली जनजागृती, प्रचार आणि प्रसार त्यामुळे विदर्भातूनही यकृत, किडनीचे दान होत आहे. किडनी, नेत्रदानातून अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळत आहे. 
- डॉ. रवी वानखेडे, सचिव विभागीय अवयवदान समिती, नागपूर.

Web Title: nagpur vidarbha nagpur Liver transplant in mumbai