१०० कोटींचेही रस्ते अपूर्ण!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

नागपूर - महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात १०० कोटी व दुसऱ्या टप्प्यात ३२४ कोटींच्या रस्त्यांची घोषणा करण्यात आली. मात्र, दोन्ही टप्प्यांतील सिमेंट रस्त्यांच्या एकूण किमतीपैकी १०० कोटींचेही रस्ते पूर्ण झाले नसून कासवगतीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचवेळी कंत्राटदारांनी महापालिका व नेत्यांचीही थट्टा चालविल्याचे चित्र आहे. 

नागपूर - महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात १०० कोटी व दुसऱ्या टप्प्यात ३२४ कोटींच्या रस्त्यांची घोषणा करण्यात आली. मात्र, दोन्ही टप्प्यांतील सिमेंट रस्त्यांच्या एकूण किमतीपैकी १०० कोटींचेही रस्ते पूर्ण झाले नसून कासवगतीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचवेळी कंत्राटदारांनी महापालिका व नेत्यांचीही थट्टा चालविल्याचे चित्र आहे. 

शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेले सिमेंट रस्त्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महापालिकेचेही पदाधिकारी अभिमानाने भाषणात उल्लेख करतात. महापालिकेने १०० कोटींच्या पहिल्या टप्प्यातील सिमेंट रस्ते पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात ३०० कोटींच्या रस्त्यांची घोषणा केली. या रस्त्यांसाठी राज्य शासन, नागपूर सुधार प्रन्यास आणि महापालिका प्रत्येकी १०० कोटी रुपये देणार आहे. एकाच कंत्राटदारांना काम दिल्यास सिमेंट रस्ता रखडण्याचा पूर्वानुभव बघता स्थायी समितीने दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांचे २४ पॅकेज तयार केले होते. यामुळे जलदगतीने कामे होतील, असा दावा तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी केला होता.

दुसऱ्या टप्प्यात एकूण ७० किमीच्या रस्त्यांच्या निविदाही काढल्या. मात्र, अद्याप पहिल्या १०० कोटींच्या टप्प्यातील रस्तेही अपूर्ण आहेत. पहिल्या टप्प्यात २५ किमी सिमेंट रस्ते होते. 

यापैकी केवळ ११ किमीचे काम पूर्ण झाले असून, १५ किमीच्या सिमेंट रस्त्यांचे काम अपूर्ण असल्याचे सूत्राने नमूद केले. यात प्रामुख्याने ग्रेट नाग रोड सिमेंट रस्त्याचा समावेश आहे. 

हा रस्ता केवळ बैद्यनाथ चौकापर्यंत तयार झाला असून, पुढील काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. दुसऱ्या तीनशे कोटींच्या टप्प्यात ७०.८८ किमीचे रस्ते असून यातील ३५ किमीची कामे सुरू आहेत. अद्याप निम्मे रस्त्यांची कामे सुरू झाली नसून ज्या रस्त्यांची कामे सुरू झाली तेही अपूर्ण किंवा रखडलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ही कामे अपूर्ण असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान आणखी तीनशे कोटींच्या सिमेंट रस्त्यांची घोषणा केली. 

मात्र, पहिल्या दोन टप्प्यांतील सिमेंट रस्ते अपूर्ण असल्याने शहरातील मोठ्या नेत्यांचीही कंत्राटदारांकडून थट्टा चालविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

ग्रेट नाग रोड अपघातप्रवण स्थळ 
पहिल्या टप्प्यातील ग्रेट नाग रोड संपूर्णपणे सिमेंट रस्त्याचा प्रस्तावित आहे. मात्र, जगनाडे चौकापासून हा रस्ता केवळ बैद्यनाथ चौकापर्यंत तयार झाला आहे. बैद्यनाथ चौक ते धंतोली रेल्वे पुलापर्यंत अद्यापही सिमेंट रस्त्यांचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्याची संपूर्णपणे चाळणी झाली असून दररोज अपघात होत असल्याचे येथील वाहतूक पोलिसांनी नमूद केले. 

युनिटी इन्फ्रास्ट्रक्‍चरचा आश्‍वासनाला हरताळ 
ग्रेट नाग रोडचे काम करणाऱ्या युनिटी इन्‍फ्रास्ट्रक्‍चरने चार महिन्यांपूर्वी महापालिकेला सात महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, कंपनीने आश्‍वासनाला हरताळ फासल्याचे चित्र आहे. या कंपनीला यापूर्वीही २००३ मध्ये जरीपटक्‍यातील एका मॉलचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीने तेही काम सोडले होते. अखेर दुसऱ्या कंत्राटदाराने मॉलचे काम पूर्ण केले.

वेगाने कामे होण्याचा दावा पोकळ 
एकाच कंत्राटदाराला काम दिल्याने सिमेंट रस्ते रखडण्याचा अनुभव महापालिकेच्या गाठीशी होता. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील तीनशे कोटींच्या सिमेंट रस्त्यांसाठी २४ पॅकेज तयार करण्यात आले. अर्थात सिमेंट रस्त्यांची कामे वेगाने व्हावीत, असा हेतू महापालिकेचा होता. मात्र, कंत्राटदारांनी महापालिकेच्या उद्देशाला सुरुंग लावला असून वेगाने कामे होण्याचा दावाही पोकळ ठरला आहे.

Web Title: nagpur vidarbha news 100 crore road uncomplete