१३ हजारांवर चेंबर चोक

१३ हजारांवर चेंबर चोक

जुन्या सिवेज लाइनचे भिजत घोंगडे : पावसात सांडपाणी येणार रस्त्यांवर  

नागपूर - शहरात अजूनही ब्रिटिशकालीन जीर्ण सिवेज लाइन असून, नवीन सिवेज  लाइनचे भिजत घोंगडे कायम आहे. जुन्या सिवेज लाइनवरील चेंबरही जीर्ण झाले असून, वाढलेल्या लोकसंख्येच्या ताणामुळे ते तुंबत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. जुन्या सिवेज लाइनवरील १३ हजारांवर चेंबर चोक झाल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. एकीकडे उंच सिमेंट रस्त्यांमुळे पावसात रस्त्यांवर तलावाची शक्‍यता निर्माण झाली असताना तुंबलेल्या  चेंबरमुळे घाण पाणीही घरांत, रस्त्यांवर येणार असल्याने नागपूरकरांची पुरती कोंडी होणार आहे. 

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली, त्या तुलनेत शहरातील जुन्या सिवेज लाइनही नव्याने टाकण्याची गरज होती. परंतु, ३० लाख लोकसंख्येचा ताण जुन्या जीर्ण सिवेज लाइनवर पडत असून, ठिकठिकाणी चेंबर तुटले आहेत. आजही शहरात जुनी १०० ते १,८०० मिलिमीटर व्यासाची लहान व मोठी १,६७० किमीची सिवेज लाइन आहे. वाढलेल्या लोकसंख्येचा तसेच शहरात सतत ये-जा करणाऱ्या लाखो लोकांची घाण वाहून नेण्याची क्षमता या सिवेज लाइनमध्ये नाही. या सिवेज लाइनवरील जवळपास २६ हजार चेंबर असून, ताण वाढल्याने यातील निम्मे  चेंबर कायम तुंबत असल्याचे महापालिकेच्या पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या ‘सिटी सॅनिटेशन प्लान’मध्येच नमूद आहे. गेल्या पाच वर्षांत केवळ सिवेज लाइनचा आराखडा तयार करण्यापलीकडे महापालिकेने कुठलीही तसदी घेतली नाही. परिणामी दरवर्षी ही जुनी सिवेज लाइन असलेल्या परिसरातील घरांमध्ये पावसाळ्यात सांडपाणी परत येते. यात रामदासपेठ, धंतोलीसारख्या ‘पॉश’ भागासह बर्डी, महाल, इतवारी, मस्कासाथ, जागनाथ बुधवारी या दाटवस्त्यांतील घरांचाही समावेश आहे. यंदा शहरातील सिमेंट रस्ते उंच झाल्याने अनेक परिसरातील घरे खोलगट भागात गेल्यासारखे चित्र आहे. सिमेंट रस्त्यांना अनेक ठिकाणी ड्रेनेज लाइन नाही, त्यामुळे या सिमेंट रस्त्यांवरील पाण्याचा ताणही या जीर्ण सिवेज लाइनवर राहणार आहे. परिणामी जीर्ण चेंबर आणखी तुटून सिवेज लाइन तुंबण्याचे प्रकार वाढण्याची शक्‍यता असून यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांची कोंडी होणार आहे.

आरोग्याची समस्या भेडसावणार 
पावसाळ्यात सांडपाणी नागरिकांच्या घरात परत शिरण्याची शक्‍यता आहे. एकीकडे सिमेंट  रस्त्यांना ड्रेनेज लाइन नसल्याने या पावसाळी पाण्याचा ताण जुन्या जीर्ण सिवेज लाइनवर पडणार आहे. या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठ्या सिवेज लाइनला जोडलेल्या लहान सिवेज लाइनमधील पाण्याचा प्रवाह रोखला जाणार असून, नागरिकांच्या घरांत हे पाणी परत येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात अशा घरांमध्ये कावीळ, मलेरिया आदी रोगांची लागण होऊन आरोग्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे.
 

...तर शहर होणार गटार   
१९४५ ते ५० या काळात विटा व मातीच्या मिश्रणाने इंग्रजांनी ही सिवेज लाइन तयार केली  होती. ती ६० ते ६५ वर्षे जुनी असल्याने महापालिकेने पर्यायी सिवेज लाइन तयार करणे गरजेचे होते. अचानक ही संपूर्ण सिवेज लाइन खचल्यास संपूर्ण शहर सांडपाण्याचे गटार होण्याची  शक्‍यता आहे. शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी दुसरी पर्यायी व्यवस्थाच नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. सिवेज लाइनचा १२५० कोटींचा विकास आराखड्याच्या प्रस्ताव अद्याप रखडला आहे. 

मागील वर्षी मस्कासाथमध्ये जीर्ण सिवेज लाइनचे चेंबर खचले होते. हे चेंबर तयार करण्यात  आले असून, परिसरातील सिवेज लाइन या चेंबरला जोडण्यात येत आहे. राऊत चौकापासून येणाऱ्या सिवेज लाइनचे काम मंदगतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. 
- आभा पांडे, नगरसेविका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com