२१० कॅमेऱ्यांचा ‘वॉच’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

नागपूर - तांत्रिक अडचणींमुळे नागपूर रेल्वेस्थानकावर सीसीटीव्हीच्या प्रकल्पात खोडा निर्माण झाला होता. आता अडसर दूर होऊन निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. महिनाभरात २१० सीसीटीव्हींसह यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया सुरू होईल. यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक डोळस होऊन प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळेल.

नागपूर - तांत्रिक अडचणींमुळे नागपूर रेल्वेस्थानकावर सीसीटीव्हीच्या प्रकल्पात खोडा निर्माण झाला होता. आता अडसर दूर होऊन निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. महिनाभरात २१० सीसीटीव्हींसह यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया सुरू होईल. यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक डोळस होऊन प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळेल.

नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १०० हून अधिक प्रवासी गाड्या धावत असून, २५ हजारांवर प्रवाशांचा राबता असतो. ‘सकाळ’च्या पाठपुराव्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदोष जुनी सीसीटीव्ही यंत्रणा बदलण्याचा निर्णय घेतला. यासाठी नोएडा येथील मे. वॉन्टेज आयएसएस प्रा. लि. कंपनीची निविदा मंजूर केली आहे. सुमारे ४ कोटींच्या प्रकल्पाअंतर्गत कामांना महिनाभराच्या आत सुरुवात होईल. कंपनीला ६ महिन्यांच्या आत संपूर्ण यंत्रणेचे काम पूर्ण करायचे आहे. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर स्थानकावर ‘इन्टीग्रेटेड सेक्‍युरीटी सिस्टीम’ (एकात्मिक सुरक्षा यंत्रणा) उभारण्याचा जुना प्रस्ताव आहे. या प्रकल्पाअंतर्गत रेल्वेस्थानकाचा प्रत्येक कोपरा ‘दृष्टिपथात’ येईल या पद्धतीने अत्याधुनिक सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे.

‘सकाळ’ने ‘स्टिंग ऑपरेशन’च्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढताच प्रशासन सक्रिय झाले. तातडीने तीन सदस्यीय समितीचे गठन करून स्थानकाचे सेक्‍युरीटी ऑडिट केले. त्यात त्रुटीपूर्ण कॅमेऱ्यांचा विषय प्रकर्षाने मांडला गेला. रेल्वे मंत्रालयाच्या समितीनेसुद्धा गांभीर्याने दखल घेतली. वाढत्या दबावामुळे सीसीटीव्हीसाठी तातडीने निविदा मागवल्या होत्या. परंतु,  तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ऐनवेळी निविदा प्रक्रिया रद्द केली होती. ‘सकाळ’च्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे.

गुन्हेगारीवर टाच
रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक २१० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. स्थानकाच्या प्रत्येक कोपऱ्यावर लक्ष ठेवता येईल यादृष्टीने कॅमेऱ्यांची जागा निश्‍चित केली जाईल. ३६० अंश फिरू शकतील आणि अंधारातही योग्य चित्रीकरणाची क्षमता असणाऱ्या कॅमेऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. सोबतच वेगळे नियंत्रण कक्ष निर्माण करून लक्ष ठेवण्यासाठी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे गुन्हेगारांवर टाच येणार आहे.

Web Title: nagpur vidarbha news 210 camera watch