सलग ८० तासांपेक्षा जास्त ड्यूटी!

सलग ८० तासांपेक्षा जास्त ड्यूटी!

नागपूर - मद्यधुंद अवस्थेत हैदोस घालत थर्टीफर्स्ट साजरा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी नागपूर पोलिस ३१ डिसेंबरच्या सकाळी नऊ वाजतापासूनच रस्त्यावर उभे आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पुन्हा पोलिस चोवीस तास ड्यूटीवर होते.

दुसऱ्या दिवशीपासून थोडी उसंत मिळेल, अशी आशा असतानाच कोरेगाव भीमाच्या हिंसाचारामुळे महाराष्ट्र बंदमध्ये जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक झाली. त्यामुळे गेल्या ८० तासांपेक्षा जास्त वेळ पोलिस डोळ्यांत तेल घालून कर्तव्य बजावत आहेत.  

थर्टीफर्स्ट आणि नववर्षाचे स्वागत आटोपल्यानंतर १ जानेवारीला नागपूर पोलिस नेहमीप्रमाणे ड्यूटीवर होते. अचानक कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली. आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्याने आंदोलन पेटले. त्यामुळे राज्यातील सर्वच पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वच प्रकारच्या सुट्या रद्द करून कर्तव्यावर हजर होण्याचे आदेश गृहमंत्रालयातून सुटले. तेव्हापासून सलग आजपर्यंत ते कार्यरत आहेत. 

थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशीच्या सलग बंदोबस्तामुळे पोलिसांवर ताण होता. त्यात कोरेगाव भीमा हिंसाचार घडल्याने पोलिसांच्या ताणात भर पडली. किरकोळ कारणावरून पोलिसांशी वाद किंवा हुज्जत घालणाऱ्यांनी पोलिसांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्याशी सौजन्याने वागण्याचे आवाहन सोशल मीडियावर फिरत आहे. मंगळवारी सायंकाळपासूनच पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी ड्यूटीवर हजर होण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने उपराजधानीतील कायदा, सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस आयुक्‍त स्वतः इंदोरा चौकात बंदोबस्त सांभाळत होते. शहरातील अनेक चौकांत तोडफोड, जाळपोळ होऊ नये म्हणून पोलिस कर्मचारीसुद्धा अलर्ट होते. हे आंदोलन शांततेत पार पाडण्यात पोलिसांची मोठी भूमिका आहे. बुधवारी सायंकाळी प्रकाश आंबेडकरांनी बंद मागे घेतल्याने पोलिसांनी थोडाफार का होईना सुटकेचा निःश्‍वास सोडला.

आरोग्यावर परिणाम
सलग ८० तासांपेक्षा जास्त ड्यूटी झाल्याने पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. बंदोबस्ताचा ताण वाढत असल्याने पोलिसांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागण्याचे आवाहन सोशल मीडियातून करण्यात येत आहे. ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या वाहनचालकांसह आंदोलकांनी बोलताना संयम बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com