आरोपीला २४ वर्षे कारावास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नागपूर - एकतर्फी प्रेमाला विरोध करणाऱ्या तरुणीच्या प्राध्यापक वडिलांची हत्या करणाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांनी गुरुवारी (ता. १४) २४ वर्षे कारावास आणि १७ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपीचे नाव अन्वर समीउद्दीन खान (वय ३०, रा. श्रीनगर, मानेवाडा) असून त्याच्यावर प्रा. योगेश्‍वर डाखोरे यांच्या हत्येचा आरोप आहे. 

नागपूर - एकतर्फी प्रेमाला विरोध करणाऱ्या तरुणीच्या प्राध्यापक वडिलांची हत्या करणाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांनी गुरुवारी (ता. १४) २४ वर्षे कारावास आणि १७ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपीचे नाव अन्वर समीउद्दीन खान (वय ३०, रा. श्रीनगर, मानेवाडा) असून त्याच्यावर प्रा. योगेश्‍वर डाखोरे यांच्या हत्येचा आरोप आहे. 

प्राध्यापक डाखोरेंच्या मुलीला अन्वर खान खूप त्रास द्यायचा, प्रेमासाठी गळ घालायचा. या साऱ्या मनस्तापाला कंटाळून डाखोरेंच्या मुलीने १९ फेब्रुवारी २०१३ रोजी भावासह जाऊन हुडकेश्वर पोलिसात अन्वर खानविरोधात तक्रार दिली. पण नागपूर पोलिसांनी नेहमीप्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करून अन्वरला स्वस्तात सोडून दिले. मुलीने दिलेल्या तक्रारीमुळे संतापलेला अन्वर डाखोरेंच्या श्रीनगर भागातील आलिशान बंगल्याच्या शेजारी निमार्णाधीन इमारतीमध्ये दबा धरून बसला होता. त्याच इमारतीवरून त्याने २ मार्च रोजी डाखोरेंच्या गच्चीत प्रवेश केला आणि दरवाजा तोडून घरात शिरला. रात्री २.३० वाजता झालेल्या आवाजाने प्राध्यापक डाखोरे जागे झाले. त्यावेळी अन्वरने अगदी जवळून देशी बंदुकीतून डाखोरेंच्या डोक्‍यात गोळी घातली. यावेळी डाखोरेंना वाचवायला पत्नी कुसुम समोर आल्या, त्यांनाही अन्वरने गोळी घालण्याचा प्रयत्न झाला. पण बंदूक बिघडल्याने त्या वाचल्या. अन्वरने त्यांच्यावर चाकू आणि रॉडने हल्ला केला. 
यानंतर त्याने मुलीला गच्चीवर नेऊन तिचे डोके भिंतीवर आपटले.

डाखोरेंच्या घरून येणाऱ्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. त्यांनी अन्वरपासून मुलीची सुटका केली. दरम्यान, पोलिसदेखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अन्वरविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

या प्रकरणातील साक्षीपुरावे तसेच आरोपीकडून जप्त करण्यात आलेले हत्यार आदींच्या आधारावर सत्र न्यायालयाने त्याला १४ वर्षे जन्मठेप, इतर कलमांतर्गत गुन्‍ह्यांमध्ये १० वर्षे कारावास आणि एकूण १७ हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम प्रा. डाखोरेंच्या पत्नीला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. याप्रकरणी सरकारतर्फे सरकारी वकील ज्योती वजानी यांनी तर डाखोरेंतर्फे ॲड. प्रकाश जयस्वाल, आरोपीतर्फे ॲड. सुदीप जयस्वाल आणि भारत बोरीकर यांनी बाजू मांडली.

Web Title: nagpur vidarbha news accused 24 years punishment